वसई: पावसाचा मंदावलेला जोर आणि स्थिरावलेले वातावरण यामुळे वसई भाईंदर रो-रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ८ ऑगस्टपासून नवे वेळापत्रक लागू होणार असून रो-रोच्या परीक्षा वेळही घटविण्यात आली आहे.
पावसामुळे खराब झालेले रस्ते, लांबचलांब लागणाऱ्या वाहनांच्या रांगा आणि दररोजची वाहतूक कोंडी यामुळे वसई ते भाईंदर प्रवास करणारे अनेक प्रवासी वसई-भाईंदर रो-रो बोटींचा पर्याय निवडतात. रस्ते मार्गाने वसई ते भाईंदर ३८ किमी लांबीचा मार्ग पार करण्यासाठी प्रवाशांना किमान एक ते दीड तास इतका कालावधी लागतो. मात्र, रो-रो बोटींच्या माध्यमातून हे एक ते दीड तासभराचे अंतर अवघ्या २० मिनिटात पार करणे शक्य होते.
वसई-भाईंदर दरम्यान महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे रो-रो सेवा सुरू करण्यात आली होती. तर सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या मार्फत ही चालविली जाते. दररोज अनेक प्रवासी या बोटींनी प्रवास करतात. मात्र, मुसळधार पाऊस, वेगाने वाहणारे वादळी वारे, समुद्रात उसळणाऱ्या लाटा यामुळे रो-रो सेवेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता. जुलै महिन्यात पावसाळी वेळापत्रक लागू करून केवळ आठच फेऱ्या सुरू ठेवण्यात आल्या होत्या.
मात्र, जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाचा ओसरलेला जोर आणि स्थिरावलेले वातावरण यामुळे रो-रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्याकडून घेण्यात आला आहे. शुक्रवार, ८ ऑगस्टपासून नवे वेळापत्रक लागू करण्यात येणार असून रो-रोच्या फेऱ्या ८ वरून वाढवून १३ करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे वसई ते भाईंदर दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचे मत कंपनीकडून व्यक्त करण्यात आले आहे.
वेळापत्रकातील बदल:
यापूर्वी वसईहून पहिली फेरी सकाळी ८.१५ वाजता आणि शेवटची फेरी संध्याकाळी ७ वाजताची होती. तर भाईंदरहून पहिली फेरी सकाळी ९ वाजता आणि शेवटची फेरी संध्याकाळी ७.४५ वाजताची होती. मात्र, नव्या वेळापत्रकानुसार वसईहून पहिली फेरी सकाळी ७.३० वाजताची व शेवटची फेरी संध्याकाळी ८.३० वाजताची असणार आहे. तसेच भाईंदरहून पहिली फेरी सकाळी ८ वाजता आणि शेवटची फेरी रात्री ९.१५ वाजताची असणार आहे. त्याचप्रमाणे प्रतीक्षा वेळेतही अर्ध्या तासाने घट करण्यात आली आहे. यामुळे दीड तासाऐवजी एक तासाच्या अंतराने बोटी चालवल्या जातील, अशी माहिती वसई-भाईंदर रो-रो व्यवस्थापक अरबाज शेख यांनी दिली.
