वसई: मागील काही दिवसांपासून वसई पूर्वेच्या भोयदापाडा येथील कचरा भूमीला आगी लागण्याच्या घटना घडत असताना, आता कचरा भूमीवर उभ्या असलेल्या वाहनाला ही आग लागल्याची घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी ४ वाजता कचरा वाहतूक करणाऱ्या कॉम्पॅक्टर वाहनाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत वाहन जळून खाक झाले आहे.

वसई पूर्वेच्या भोयदापाडा येथे महापालिकेची कचरा भूमी आहे. या कचराभूमीवर शहरातील गोळा होणारा कचरा कॉम्पॅक्टर वाहनांच्या साहाय्याने आणून टाकला जातो.शनिवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास कचरा वाहतूक करणारे कॉम्पॅक्टर अगदी कचरा भूमीच्या जवळ उभा असताना अचानकपणे वाहनाला आग लागल्याने एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती तातडीने महापालिकेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली.या आगीत वाहन जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अजूनही समजू शकले नाही.शहरात दिवसभरातील आगीची ही चौथी घटना आहे.