वसई: वसई विरार शहरात विविध ठिकाणी अनधिकृत जाहिराती लावून शहराचे विद्रूपीकरण केले जात असताना, माजी आमदारांच्या वाढदिवसाचा जाहिरात फलक थेट दिशादर्शक फलकावर लावण्यात आला असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अनधिकृत जाहिरातींविरोधात पालिकेकडून केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष व माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचा ३ ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर वसई-विरारमध्ये कार्यकर्ते, माजी नगरसेवक व विविध संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर शुभेच्छांचे फलक लावले जात आहेत. काही जणांनी रीतसर पालिकेची परवानगी घेऊन लोखंडी सांगाड्यांवर फलक उभारले असले, तरी अनेकांनी नियम धाब्यावर बसवून जागा मिळेल तिथे अनधिकृत फलक ठोकले आहेत.
वसई पश्चिमेकडील स्टेला पेट्रोल पंपानजीकच्या मुख्य दिशादर्शक फलकावरच असाच एक अनधिकृत शुभेच्छा फलक लावला गेला आहे. हा रस्ता वसई रेल्वे स्थानक, वसई गाव, उमेळा आणि माणिकपूर या वर्दळीच्या भागांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. बाहेरील प्रवासी, डिलिव्हरी बॉय आणि वाहनचालकांसाठी हे दिशादर्शक बोर्ड अत्यंत गरजेचे असतात. मात्र, त्यावरच जाहिरात लावल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
कायद्यानुसार रस्ते, विजेचे खांब आणि दिशादर्शक फलकांसारख्या सार्वजनिक मालमत्तेवर जाहिरातबाजी करणे बेकायदेशीर आहे. असे असतानाही राजकीय नेत्यांच्या वाढदिवसांबरोबरच खाजगी प्रदर्शन व कार्यक्रमांचे फलकही बसथांबे, झाडे व विजेच्या खांबांवर अनधिकृतपणे टांगले जात आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत असून, अशा नियमबाह्य जाहिरातदारांवर महापालिका कडक कारवाई करणार का, असा सवाल नागरिक विचारत आहेत
