वसई: वसईच्या भूमिअभिलेख उपअधीक्षकांचा मनमानी कारभार व कार्यालयातील कथित घोटाळ्याविरोधात वसई विरार जनशक्ती आघाडीकडून गुरुवारी जनआक्रोश आंदोलन पुकारण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, जिल्हा अधीक्षकांनी दिलेले आश्वासन व चर्चेनंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
उपअधीक्षक भूमिअभिलेख वसई अमोल बडदे यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरोधात गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी जनआक्रोश धरणे आंदोलन पुकारण्याची घोषणा वसई विरार जनशक्ती आघाडीने केली होती. तसेच वसईतील भूमिपुत्र व भूधारकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले होते.
मात्र, या आंदोलनाची दखल घेत मंगळवारी (३ नोव्हेंबर) जिल्हा अधीक्षक नरेंद्र पाटील यांनी वसई कार्यालयाला भेट देऊन शिष्टमंडळाशी सुमारे दोन तास सविस्तर चर्चा केली. यावेळी गुरुवारी आंदोलनाच्या दिवशी आपण स्वतः येऊन वसईकर जनतेच्या तक्रारी व व्यथा ऐकाव्यात अशी विनंती शिष्टमंडळाने त्यांना केली. पण, गुरुवारी न्यायालयीन सुनावणी असल्याने जिल्हा अधीक्षक व उपअधीक्षक दोघांनाही न्यायालयात उपस्थित राहावे लागणार असल्याने वसई कार्यालयात येणे शक्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
तर, वसईतील भूमिपुत्र, भूधारक व तक्रारदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी मंगळवार, १७ नोव्हेंबर रोजी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय वसई येथे जातीने हजर राहणार असल्याचे जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख, पालघर यांनी सांगितले आहे. त्यामुळे ५ नोव्हेंबर रोजी पुकारले जाणारे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती आघाडीतर्फे देण्यात आली.
