वसई: वसईसह महाराष्ट्रभरात पावसाने हजेरी लावली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात पडणाऱ्या पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर या साचलेल्या पाण्यात वाहने चालवल्यास अनेकदा वाहन बंद पडतात वाहनचालकांना वाहने ढकलत घरी न्यावी लागतात. पण वसईतील एका तरुणाने या समस्येवर काढलेला अजब तोडगा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काही नेटकऱ्यांनी या जुगाडाला सायलेन्सर हॅक असंही नाव दिलंय.

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहरातील पावसाचा जोर वाढला आहे. तर अपुरी गटार व्यवस्था, तुंबलेले नाले, बंद करण्यात आलेले नैसर्गिक मार्ग, अवैध माती भराव यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचू लागले. वसई विरार शहरातील गास-नालासोपारा, गिरीज-अर्नाळा, बंगली, सनसिटी तसेच महामार्गाला जोडणारे महत्त्वाचे रस्तेही पाण्याखाली गेले आहेत.

या गुडघाभर साचलेल्या पाण्यातून वाहने चालवताना वाहनाचे इंजिन, सायलेंसरमध्ये पाणी शिरून अनेकदा भर पावसात वाहने बंद पडतात आणि यामुळे चालकांवर ढकलत वाहन घरी नेण्याची वेळ ओढवते. मात्र, वसईच्या एका तरुणाने यावर अजब तोडगा शोधून काढला आहे. त्याने आपल्या दुचाकी विडिओ शेअर केला असून त्याने आपल्या स्कूटरच्या सायलेन्सरला एक लांब आणि लवचिक पाईप जोडला असल्याचे दिसून येत आहे. तर या पाईपचे दुसरे टोक त्याने पाण्याच्या पातळीच्या बरेच वर बांधले असल्यामुळे सायलेन्सरमधून निघणारा धूर थेट या पाइपमधून बाहेर पडत आहे. यामुळे गुडगाभर साचलेल्या पाण्यातही स्कूटर बंद न पडता सुसाट चालत असल्याचे दिसत आहे.

हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर कौतुकाचा वर्षाव सुरू केला आहे. अनेकांनी या कल्पकतेला पीक इंडियन जुगाड असे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी सायलेन्सरमध्ये पाणी जाणे रोखले तरी, इतक्या खोल पाण्यातून गाडी चालवल्यास इंजिनच्या इतर भागांमध्ये पाणी जाऊ शकते. तसेच आधुनिक स्कूटर्समध्ये मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक पार्टस असतात, जे पाण्याच्या संपर्कात आल्यास शॉर्टसर्किट होऊन कायमचे खराब होऊ शकतात. त्यामुळे अशा पूरसदृश किंवा पाणी साचलेल्या रस्त्यांवरून गाडी चालवण्यापेक्षा, पाणी ओसरण्याची वाट पाहणे हाच सर्वात सुरक्षित आणि शहाणपणाचा पर्याय आहे, असे मतही व्यक्त केले आहे.