वसई: नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतील राजकीय वादातून भाजपा नगरसेवकाने तरुणाला कार्यालयात बोलावून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नगरसेवक आणि त्यांच्या काही साथीदारांविरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, तक्रारदाराने केलेला मारहाणीचा आरोप खोटा असल्याचा दावा भाजप नगरसेवकाने केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या वसई विरार महापालिका निवडणुकीनंतर विविध कारणांमुळे भाजप पक्ष आणि भाजपचे नगरसेवक चांगलेच चर्चेत येत आहेत. याच दरम्यान असेच एक प्रकरण पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.

तक्रारीनुसार, रवी भरत झा हा माणूस वसई पूर्वेला वास्तव्यास आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास मुनीम उर्फ मुन्ना गुप्ता आणि नगरसेवक गणेश पाटील यांचा पीए यांनी रवी झा यांना नगरसेवक पाटील यांच्या कार्यालयात बोलावून नेले. यावेळी तू बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता आहेस ना? तू त्यांचा प्रचार केलास ना? असे विचारून मुन्ना गुप्ता, नगरसेवक गणेश पाटील यांचा पीए, नगरसेवक गणेश पाटील आणि चार ते पाच अनोळखी इसमांनी त्यांना मारहाण लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

तसेच या दरम्यान शिवीगाळ करत कार्यालयातील लाकडी दांडक्याने उजव्या खांद्यावर आणि दोन्ही पायांवर जखम होईपर्यंत अमानुष मारहाण केली असल्याचे झा यांनी म्हटले आहे. तसेच मारेकऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीने तक्रारीत सांगितले आहे. जखमी तरुणावर उपचार सुरू असून याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१ (२), १८९ (२), १९१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मारहाणीचे आरोप चुकीचे…

रवी झा याच्या घराच्या बाजूला एक कंपनी आहे. गुरुवारी या कंपनीच्या साफसफाईचे काम सुरू होते. पण, सफाईदरम्यान निघणारे पाणी आणि कचरा रस्त्यावर येत असल्यामुळे मुन्ना गुप्ता याने तिकडे जाऊन विचारणा केली असता कंपनी नवीन असल्यामुळे साफसफाई सुरू असल्याचे कळले. पण, यावेळी शेजारी राहणाऱ्या रवी झा याने काहीच संबंध नसताना मुन्ना गुप्ता याच्यासोबत वाद घातला. त्यामुळे मी त्याला (रवी झा) ऑफिसला बोलावलं आणि समज दिली. पण, माझ्यावर होत असलेले मारहाणीची आरोप खोटे आहेत. मी रवी झा याला मारहाण केलेली नाही, अशी प्रतिक्रिया नगरसेवक गणेश पाटील यांनी दिली आहे. तसेच हे मला एकप्रकारे फसवण्याचे षडयंत्र असल्याचा दावाही पाटील यांनी केला आहे.