वसई:- डॉक्टरने दिलेल्या चुकीच्या औषधामुळे वसईत ८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वालीव पोलिसांनी फसवणूक तसेच विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसई पूर्वेच्या भोयदापाडा येथे मरियम मोहम्मद अन्सारी ही ८ वर्षाची मुलगी आपल्या पालकांसह रहात होती. सोमवार २८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तिला उलट्या सुरू झाल्या. तिच्या आईने तिला याच राजावळी पालनगर येथील राहुल क्लिनिकच्या ध्रुपचंद निषाद (४२) या डॉक्टरकडे नेले. डॉक्टरने तिला तपासून गोळ्या दिल्या तसेच दोन इंजेक्शन दिले होते. दुसर्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी तिच्या आईने तिला चहा, टोस्ट दिले. त्यानंतर तिच्या नाकातून आणि तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला.मुलीवर चुकीचे औषध उपचार झाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला. मुलीच्या नातेवाईकांनी केलेला आरोप चुकीचा असून तपासानंतरच सत्य समोर येईल असे राहुल क्लीकचे ध्रुपचंद यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच वसई विरार महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने राहुल क्लिनकची तपासणी केली. ध्रुपचंद निषाद हा इलेक्ट्रो होमिओपॅथीचे चे प्रमाणपत्र असल्याचा दावा केला. मात्र त्याच्याकडे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची कुठलीही मान्यताप्राप्त पदवी नव्हती. तरी देखील तो ॲलोपेथीचे औषधे बाहेरून आणून उपचार करत होता, असे पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ भक्ती चौधरी यांनी सांगितले.
महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीनिवासराव दुधमल यांनी निषाद विरोधात वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) तसेच विनापरववाना वैद्यकीय व्यवसाय केल्याप्रकरणी वैद्यकीय व्यवसाय अधिनियमाच्या ३३ आणि ३३ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित डॉक्टरला नोटीस बजावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. तसेच शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप केरेकर यांनी सांगितले.
