वसई: वसई पश्चिमेतील एका गृहसंकुलात चार वर्षीय मुलाला अमानुष मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता. मिरारोडमधील वोक्हार्ट रुग्णालयात चार वर्षीय चिमुकल्यावर उपचार सुरू असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्याला २ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.
वसई पश्चिमेत अनुपम संकुल सोसायटी आहे. या गृहसंकुलात राहणाऱ्या संदीप पवार या रिक्षाचालकाने त्याच गृहसंकुलात राहणाऱ्या अतुल कोंढारे यांच्याशी झालेल्या शुल्लक वादाचा राग मनात ठेवून त्यांचा चार वर्षीय मुलगा विघ्नेश कोंढारे याला अमानुष मारहाण केली होती. या मारहाणीत विघ्नेश गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी मिरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या मारहाणीच्या घटनेची सीसीटीव्ही चित्रफीत सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. तर वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनीही रुग्णालयात जाऊन जखमी मुलाची व त्याच्या कुटुंबाची भेट घेतली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपर्क साधून या घटनेची माहितीही त्यांनी दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी ही घटना अत्यंत गंभीर व मानवतेला काळिमा फासणारी असल्याचे नमूद करत दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले.
तर जखमी मुलाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी जखमी मुलाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून विशेष बाब म्हणून आर्थिक मदत मंजूर करण्याची विनंती केली होती. या विनंतीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी विघ्नेश कोंढारे याच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ लाख इतकी आर्थिक मदत मंजूर करण्याचे आदेश दिले व त्याप्रमाणे निधी कक्षातून तातडीने ही रक्कम वोक्हार्ट रुग्णालयाकडे हस्तांतरीत करण्यात आली. तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून उपचार खर्चात सुमारे २० टक्के सवलतही जखमी मुलाला मिळवून देण्यात आली.
