वसई: नाताळनिमित्त वसईत दरवर्षी येशू जन्माचा देखावा असलेले नाताळ गोठे उभारले जातात. यंदाच्या वर्षात धार्मिक प्रबोधनासह पर्यावरणाचे संरक्षण, सामाजिक सलोखा, तसेच वसई विरार शहरातील विविध समस्यांवर लक्ष वेधणारे गोठेही तयार करण्यात आले होते.
विद्युत रोषणाई, कॅरल सिंगिंग, ख्रिसमस कार्निवल यांच्या माध्यमातून वसई विरार शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात नाताळ साजरा केला जातो. मात्र, या सणाचे विशेष आरक्षण म्हणजे नाताळ गोठे. वसईत चर्चच्या आवारात, घरच्या बाहेर तसेच काही ठिकाणी अगदी तलावातही नाताळ गोठे तयार केले जातात.
परंपरागत बनवण्यात येणाऱ्या नाताळ गोठय़ांमध्ये, सर्वसाधारणपणे डोंगर, नद्या, गवताळ परिसर तसेच लाकडी गोठा, मध्यभागी बाळ म्हणजेच येशू आणि डोक्यावर रंगवण्यात आलेला तारा एका बाजूला मेरी तर दुसऱ्या बाजूला जोसेफ, कोपऱ्यात बसलेली गाय, आपल्या मेंढरांसोबत गोठय़ाजवळ उभे असलेले मेंढपाळ आणि भेटवस्तू घेऊन आलेले तीन राजे, अशी सजावट केली जाते.
पण, गेल्या काही काळात नाताळ गोठा हा फक्त धार्मिक प्रबोधनापर्यंत सीमित न राहता समाज प्रबोधनाचे साधन बनला आहे. त्यामुळे वसई विरारमधील विविध भागात पर्यावरणाचे संरक्षण, सामाजिक सलोखा, तसेच शहरातील पाणीटंचाई, वीजपुरवठा, अनधिकृत बांधकाम अशा विविध प्रश्नांवर भाष्य करणारे नाताळ गोठे उभारण्यात आले आहेत. तर, नंदाखाल, वसईतील सागरशेत या ठिकाणी तलावाच्या मध्यभागी उभारण्यात येणारे चलचित्र नाताळ गोठे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहेत.
नाताळ गोठे स्पर्धांमुळे तरुणांना प्रोत्साहन
वसईत चर्चच्या आवारात, सार्वजनिक ठिकाणी तसेच घरोघरी अंगणात नाताळ गोठे तयार केले जातात. पण, तरुणांनी यासाठी पुढाकार घ्यावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून विविध संस्था तसेच चर्चकडून सार्वजनिक नाताळ गोठ्यांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे यंदा शहरात मोठ्या उत्साहाने तरुणांनी नाताळ गोठे तयार केले आहेत. तसेच प्रत्येकाने आपल्या सर्जनशीलतेच्या केलेल्या प्रदर्शनामुळे ही स्पर्धा अधिकच चुरशीची होते.

