वसई: वसई पश्चिमेतील चुळणे गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. वाहतुकीचे अंतर्गत रस्ते, नाल्यावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून सलग १० ते १२ तासांपासून वीज नसल्यामुळे गावकऱ्यांचे हाल होत आहेत.

वसई पश्चिमेला चुळणे गाव परिसर आहे. या गावात स्थानिक रहिवासी आणि गेल्या काही काळात उभ्या राहिलेल्या इमारतींमुळे स्थलांतरीत नागरिकांची मोठी वस्ती आहे. मात्र, हे गाव सखल भागात वसले असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात हे गाव चहूबाजूंनी पावसाच्या पाण्याने वेढले जाते. गावातील अंतर्गत वाहतुकीचे रस्ते, मुख्य वाहतुकीचे रस्ते, नाल्यावरील पूल सर्वच पाण्याखाली जाते.

यंदाही गावात पूरजन्य परिस्थिती उद्भवली आहे. गेल्या पाच दिवसांपासून वसई विरार शहरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोमवारीही हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून सकाळपासूनच शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे चुळणे गावातील नाला ओसंडून वाहत असून नाल्याच्या दोन्ही बाजूला पाणी साचले आहे. तसेच या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून अनेकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

तसेच गावातील काही भागात लोकांच्या घराच्या आवारात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या असल्याचे देखील स्थानिकांनी सांगितले आहे. तर दरवर्षी पावसाचे पाणी परिसरात साचल्यानंतर ते ओसरेपर्यंत महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जातो. यावर्षीही अशाच पद्धतीने वीजपुरवठा खंडित केल्यामुळे नागरिकांना वीजेविना राहावे लागत असल्याचे विल्फ्रेड डिसोझा यांनी सांगितले.

वाहतुकीसाठी ट्रॅक्टरचा आधार

चुळणे- माणिकपूर, चुळणे- सांडोर, चुळणे- बाभोळा, चुळणे-सनसिटी असे गावाला जोडणारे रस्तेही पाण्याखाली गेले असल्याने ये-जा करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना प्रतिफेरी १० रुपये मोजून ट्रॅक्टरमधून प्रवास करावा लागत आहे.