वसई : वसईच्या किनार पट्टीची होणारी धूप व लाटांच्या तडाख्याने किनार पट्टीच्या भागातील होणारे नुकसान टाळण्यासाठी चार ठिकाणी धुप्रतिबंधक बंधारे तयार केले जाणार आहेत. मात्र आराखडा मंजुरी व किनारपट्टी नियमन क्षेत्र (सीआरझेड) परवानगीअभावी या बंधाऱ्यांची कामे रखडली आहेत.
वसई पश्चिमेच्या भागात विस्तीर्ण समुद्र किनारे आहे. या किनार पट्टीच्या भागातही मोठ्या संख्येने नागरिक राहत आहेत. धुप्रतिबंधक बंधारा नसल्याने किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषतः पावसाळ्यात व भरतीच्या वेळी या किनारपट्टीच्या भागात मोठंमोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळतात याचाच फटका हा किनाऱ्यालगत असलेल्या घरांना बसतो. त्यातच बेसुमार वाळू उपसा, कचरा, किनाऱ्यालगत असलेली सुरुची झाडे भरतीच्या पाण्यामुळे नष्ट झाली आहेत. तर दुसरीकडे बंधारा नसल्याने पाणी थेट समुद्र किनाऱ्यावरील विविध भागात घुसून किनाऱ्यावरील घरे, शेती, बागायती, वाळत ठेवलेली मासळी यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. यासाठी या भागात धूपप्रतिबंधक बंधारे तयार करण्यात यावे अशी मागणी केली जात होती. त्यानुसार कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत भुईगाव, रानगाव, पाचूबंदर- लांगेबंदर, नवापूर अशा चार समुद्र किनारपट्टीच्या भागात धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या मार्फत केले जाणार आहे. सद्यस्थितीत या कामासाठी लागणाऱ्या सीआरझेड परवानग्या व आराखडा निश्चिती अशी कामे अजूनही पूर्ण न झाल्याने या बंधाऱ्यांची कामे रखडली आहे. काम मंजूर होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटून गेली तरी कामाला सुरुवात होत नसल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पावसाळ्याच्या दिवसात समुद्राला मोठ्या प्रमाणात भरती सुरू असते. त्यांच्या लाटाही आता थेट किनाऱ्यावरील आतील भागात धडकत आहेत. असे असताना या कामाकडे दुर्लक्ष करणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मॅकेन्झी डाबरे यांनी सांगितले आहे. आम्ही सातत्याने मागणी करतो मात्र प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप ही त्यांनी केला.
लाटांच्या तडाख्याने किनारपट्टी धोक्यात येत आहे. तरीही प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. संपूर्ण किनार पट्टी उद्ध्वस्त झाल्यानंतर लक्ष दिले जाईल का असा संतप्त सवाल आम आदमी पार्टीचे जॉन परेरा यांनी केला आहे.
जेव्हा लाटा सुरू होतात तेव्हा किनार पट्टीच्या भागातील नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. कारण समुद्राचे पाणी कधीही किनाऱ्यावरून गावात शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांची कामे मार्गी लावण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनीही धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला. २२ महिन्यापासून हे काम रखडले असल्याचे त्यांनी सांगितले. या कामाला गती द्यावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे.
रस्ते विकास मंडळाकडून प्रयत्न
वसईच्या भागात धूप प्रतिबंधक बंधारे तयार करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केला आहे. या बंधाऱ्यांच्या कामाला आपत्ती व्यवस्थापन विभाग ४ सप्टेंबर २०२४ मे.डी. व्हि.पी. इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा.लि. या कंत्राटदाराच्या न्यूनतम प्रस्तावास मंजूरी प्राप्त झाली आहे. मात्र सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन यांच्याकडून सागरी पूरसंरक्षक बांधांचे आराखडा व किनारपट्टी नियमन क्षेत्राची परवानगी अजूनही मिळाली नाही. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे कार्यकारी अभियंता सारंग इनामदार यांनी सांगितले आहे. तेथून परवानगी येताच काम सुरू केले जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.
लाटांच्या तडाख्याने हजारो झाडे उद्ध्वस्त
यंदाच्या वर्षी पावसाळा सुरू होताच वादळी वाऱ्यामुळे समुद्रातील लाटांचा मोठा तडाखा वसईच्या किनार पट्टीला बसला आहे. यावर्षी भुईगाव यासह अन्य किनार पट्टीच्या भागात लाटा व वादळी वाऱ्यामुळे हजारो सुरुची झाडे ही उध्वस्त झाली आहेत. याशिवाय शेती व किनार पट्टीवरील घरे यांना ही याचा फटका बसला आहे.