scorecardresearch

वसईतील ‘जरी’ व्यावसायिक आर्थिक संकटात; करोनानंतरही व्यवसायाला मागणी नसल्याने कारागिरांची उपासमार

एकेकाळी प्रतिष्ठेचा आणि कलाकारांचा दर्जा असणारा ‘जरी’ व्यवसाय अजूनही मंदीच्या लाटेत गटांगळय़ा खात आहे. आधुनिक तंत्रज्ञान आल्याने या व्यवसायातील कारागिरांची मागणी कमी झाली असून करोनामुळे आलेल्या मंदीच्या लाटेत या व्यवसायावर उदरनिर्वाह करणारे असंख्य कारागिरांची उपासमार होऊ लागली आहे.

विरार : एकेकाळी प्रतिष्ठेचा आणि कलाकारांचा दर्जा असणारा ‘जरी’ व्यवसाय अजूनही मंदीच्या लाटेत गटांगळय़ा खात आहे. आधुनिक तंत्रज्ञान आल्याने या व्यवसायातील कारागिरांची मागणी कमी झाली असून करोनामुळे आलेल्या मंदीच्या लाटेत या व्यवसायावर उदरनिर्वाह करणारे असंख्य कारागिरांची उपासमार होऊ लागली आहे. शासनाकडून कोणतीच मदत मिळत नसल्याने हा व्यवसाय शेवटची घटका मोजत आहे.
वसईच्या नालासोपारा, पेल्हार, धानीव. संतोष भुवन, वसईच्या सातवली, चिंचोटी परिसरात आजही ‘जरी’ कारागीर आपली कला टिकवून पोटाची खळगी भरत आहेत. वसईत शहराबाहेर अनेक चाळीत अनेक छोटे-मोठे जरीकाम करणारे कारागीर आपला व्यवसाय करत आहेत. साडी, दुपट्टे, कुर्ते यांवर जरी करण्याचे काम ते करतात. साधारणत: एक साडी किंवा दुपट्टा तयार करण्यासाठी या कामगारांना तीन ते चार तर कधी आठ दिवससुद्धा लागतात. त्यांना या कामासाठी साडी असेल तर ४०० रुपये आणि दुपट्टा असेल तर २०० रुपये प्रमाणे मजुरी मिळते आणि याच साडय़ा अथवा दुपट्टे बाजारात पाच हजार रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत अथवा त्याहून अधिक किमतीत विकले जातात. पण या कारागिरांच्या हाती दोन वेळच्या जेवणाचे पैसेसुद्धा लागत नाहीत. सध्या अनेक कामे मशीननेसुद्धा होत असल्याने या कारागिरांना रोजगाराच मिळत नाहीत. यामुळे महिनोंमहिने कामाची वाट पाहावी लागते. त्यामुळे मिळेल त्या रोजंदारीवर हे कारागीर काम करत आहेत.
या व्यवसायात नव्या कारागिरांची भरती नगण्य आहे. यामुळे वृद्धापकाळाकडे वळलेले कारागीर या व्यवसायात शिल्लक आहेत. दुसरे काहीच करू शकत नाहीत म्हणून हेच काम करावे लागते. बाजारपेठ नाहीत, व्यवसायाला कोणत्याही शासकीय दर्जा नाही यामुळे या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. शासनाने या व्यवसायाकडे लक्ष देऊन हा व्यवसाय जागवला पाहिजे अशी मागणी हे कारागीर करत आहेत.
वसईत स्वस्त प्रमाणात गाळे मिळतात, पण त्यातही वीज-पाणी नाही. आम्ही आठ आठ दिवस एकाच वस्त्रावर काम करून २०० ते ४०० रुपये कमावतो. त्यात खाणार काय आणि भाडे देणार काय?-महमद खान, कारागीर
आम्हाला दुसरे काम येत नाही, त्यामुळे हेच काम करून आम्ही आमचा गुजारा करत आहोत. शासन जसे इतर क्षेत्रातील कारागिरांकडे लक्ष देते तसे आमच्याकडे पण लक्ष दिले पाहिजे.-अब्द्दुल रेहमान, कारागीर

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vasai commercial financial crisis craftsmen starve lack demand business corona market amy

ताज्या बातम्या