वसई: पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि पक्षाची पाळेमुळे तळागाळापर्यंत घट्ट करण्यासाठी काँग्रेस तर्फे देशपातळीवर संघटन सृजन अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत वसईत काँग्रेस नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसह नव्या जिल्हाध्यक्षांची देखील निवड केली जाणार आहे.

काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आणि जनसामान्यांशी थेट संवाद साधण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या संकल्पनेतून संघटन सृजन अभियान देशभरात राबविण्यात येत आहे. बुधवार १५ एप्रिल रोजी वसईतील पारनाका येथील काँग्रेस भवन येथून सृजन संघटन अभियानाला सुरुवात झाली आहे.

या अभियानाद्वारे बूथ स्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंतच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधला जाणार असून नऊ प्रभाग समित्या आणि ग्रामीण भागाची एक समिती अशा एकूण १० ब्लॉकसाठी ब्लॉक अध्यक्ष निवडलॆ जाणार आहेत. तर जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष या पदांसाठी देखील नव्या चेहऱ्याचा विचार केला जणार आहे. या पदाच्या निवड प्रक्रियेसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नेते बेल्लाई नाईक तर प्रदेश काँग्रेसकडून माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, संदेश कोंडविलकर, नंदा म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नियुक्त कमिटीद्वारे जिल्हाध्यक्ष पदासाठी सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी च्या जिल्हाध्यक्ष पदासाठी तब्बल २६ नावे पुढे आली आहेत. यापूर्वी वसई विधानसभा मतदार संघात दोन वेळा जिल्ह्याधक्ष पद दिले होते. त्यामुळे यावेळी नालासोपारा विधानसभा मतदार संघाला जिल्ह्याधक्ष पद देणार असल्याचे म्हटले जात आहे.

ही निवड प्रक्रियाच केंद्रीय निरीक्षकांच्या देखरेखीखाली सुरु असून चर्चेनंतर दिल्लीतील नेतृत्वासमोर अहवाल ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांनी दिली आहे.