वसई: कौटुंबिक वादातून सासूचा निर्घृण खून करून गेल्या १३ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या फरार आरोपीला अटक करण्यात वसई गुन्हे शाखा कक्ष-२ च्या पथकाला अखेर यश आले आहे. मोहम्मद अजमल मोहम्मद मन्सुरी अन्सारी उर्फ ‘पोफल’ (४४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला तामिळनाडूच्या मिंजूर (चेन्नई) येथून ताब्यात घेण्यात आले.
नेमकी घटना काय होती?
१४ सप्टेंबर २०१३ रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. पत्नी आणि सासू मिळून आपल्या नवजात मुलाला आपल्याला भेटू देत नाहीत, याच रागातून आरोपी मोहम्मद अजमल याने आपली सासू संजीता कयुम यांची निर्घृण हत्या केली होती. या थरारक हत्याकांडानंतर आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जुन्या गुन्ह्याचा नव्याने तपास
गुन्हे शाखा कक्ष-२ चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या जुन्या आणि थंड बस्त्यात पडलेल्या गुन्ह्याचा नव्याने समांतर तपास सुरू केला. पोलिसांच्या पथकाने सर्वप्रथम आरोपीच्या मुंगेर (बिहार) येथील मूळ गावी जाऊन माहिती काढली. तेव्हा धक्कादायक बाब समोर आली की, तो गेल्या १३ वर्षांत एकदाही आपल्या गावी परतला नव्हता.
त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. तपासात समोर आले की, गुन्ह्यानंतर आरोपी आधी कलकत्ता येथे आपल्या बहिणीकडे ४-५ दिवस राहिला. तिथून तो तामिळनाडूमध्ये पळून गेला आणि तिथे ५-६ वर्षे गवंडीकाम करत राहिला. त्यानंतर १ वर्ष पंजाबमध्ये काढल्यानंतर, गेल्या ५ वर्षांपासून तो चेन्नईजवळ आपले ‘पोफल’ हे नाव बदलून, नवीन ओळख निर्माण करून पोलिसांपासून लपून राहत होता. मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारे वसई गुन्हे शाखेचे विशेष पथक तात्काळ तामिळनाडूला रवाना झाले. त्यांनी २४ जून २०२६ रोजी मिंजूर (तामिळनाडू) येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
ही कारवाई वसई गुन्हे शाखा कक्ष-२ चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, संजय नवले, रवींद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, प्रफुल्ल पाटील, प्रशांतकुमार ठाकूर, सचिन पाटील, जगदीश गोवारी, राहुल कर्पे, अक्षय बांगर तसेच सायबर पोलीस ठाण्याचे संतोष चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.
