वसई: वसईत व्हेल माशाची उलटी विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीला वसई गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन किलो ५८ ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण २ कोटी ७ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट रोजी जी.जी. कॉलेजच्या मागील गेटजवळ दोन व्यक्ती संशयास्पद रीतीने थांबल्याची आणि त्यांच्याकडे प्रतिबंधित व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) असल्याची खात्रीलायक बातमी पोलिसांना मिळाली होती. या बातमीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून दुचाकीवरून आलेले उदित सातवसे (३८)आणि कृष्णाकांत देसाई (३४) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या पाठीवरील बॅगेची झडती घेतली असता, त्यात सुमारे २ कोटी ५ लाख ८० हजार रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी आढळून आली.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी या गुन्ह्यातील इतर तीन साथीदारांची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ नवघर बस डेपो परिसरात धाव घेत विशाल ठाकरे (२८) अकिल के. क्रिष्णा पीव्ही (२८) आणि सुहाद टीपी मोईद्दीन कोया (३२) या तिघांना अटक केली. या टोळीने संगनमताने कट रचून ही व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी केरळ येथून वसईत आणल्याचे तपासात उघड झाले आहे.
आतापर्यंत व्हेल माशाच्या उलटीसह दुचाकी आणि मोबाईल असा एकूण २ कोटी ७ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि वन्यजीव संरक्षण कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई वसई पोलीस ठाण्याच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौरभी पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश मासाळ, पोलीस उपनिरीक्षक वैभव पवार, तसेच पोलीस कर्मचारी व मांडवी वन परिक्षेत्राचे वनपाल प्रभाकर कुडाळकर यांच्या पथकाने केली आहे.
