वसईच्या वाघरळ पाडा येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी बिल्डर आणि जमीन मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच तीन चाळ बिल्डरांविरोधात एमआरटीपीएअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दुर्घटनेनंतर बिल्डर फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

वसई पूर्वेच्या वाघरळ पाडा येथील एका बैठ्या चाळीवर बुधवारी सकाळी दरड कोसळली होती. या दुर्घटनेत अमित सिंग (३५) आणि त्यांची मुलगी रोशनी सिंग (१५) यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर पालिकेने दिलेल्या तक्रारीनंतर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही चाळ मितवा रिॲल्टीच्या अजित सिंग उर्फ मटू या चाळ बिल्डरने बांधली होती. ती जागा मेरी ग्रेशीअस या महिलेकडून विकत घेतली होती. या दोघांवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासह महाराष्ट्र नगररचना प्रांतिक अधिनियमन (एमआरटीपीए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याशिवाय या परिसरातील शैलेश निषाद, रतनेश पांडे आणि आणि अनिलकुमार दुबे यांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५३, ५३, ५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिली.