वसई: अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळी सणासाठी गोडधोड आणि आनंदाची तयारी सुरू असतानाच, रेशनवर मिळणाऱ्या सवलतीच्या धान्यासाठी ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानांसमोर मोठी गर्दी होऊ लागली आहे.सणासुदीला हक्काचे धान्य वेळेत मिळावे, यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. मात्र, या गर्दीत होणारी धक्काबुक्की,माझा नंबर आधी यावरून होणारे वादविवाद आणि तासंतास रांगेत उभे राहण्याचा त्रास टाळण्यासाठी वसई तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी एक अत्यंत अनोखी शक्कल लढवली आहे. येथे माणसांऐवजी चक्क पिशव्यांची रांग लावून आपला नंबर निश्चित केला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अनेकदा शिधा वाटप केंद्रांवर रांगेतील नंबरवरून वाद विवाद सारखे प्रकार समोर येत असतात. मात्र वसई पूर्वेच्या भागात शिधा वाटपाचे दुकान उघडण्यात आधीच नागरिक दुकानाबाहेर पोहचतात. मात्र रांगेत उभे राहण्याची कटकट टाळण्यासाठी ते आपली पिशवी किंवा गोणपाट एकामागोमाग एक शिस्तीत ठेवून आपली जागा पक्की करतात. एकदा पिशवी ओळीत ठेवली की नंबर निश्चित होतो.
त्यानंतर नागरिक उन्हात ताटकळत उभे न राहता, नजीकच्या झाडाखाली किंवा कट्ट्यावर सावलीत बसून गप्पा मारत आपल्या नंबरची निवांत प्रतीक्षा करतात. बाहेरून येणाऱ्या एखाद्या व्यक्तीला ही अनोखी रांग पाहिल्यावर आश्चर्य वाटते, कारण दुकानाबाहेर रांगेत नागरिक उभे नसून केवळ त्यांच्या पिशव्याच शिस्तीत उभ्या असल्याचे विलोभनीय आणि मजेशीर चित्र या निमित्ताने दिसत आहे. वादविवाद टाळण्यासाठी सुरू केलेली पद्धत सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
