वसई: वसईतील डी एम पेटिट रुग्णालयात उघड झालेल्या कालबाह्य औषध प्रकरणी एकूण ९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पालिकेकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, यापैकी फक्त तीन कर्मचाऱ्यांची पालिकेकडून बदली करण्यात आली आहे.
वसई पश्चिमेतील डी एम पेटिट या शासकीय रुग्णालयातील औषध भांडारात कालबाह्य औषधे ठेवण्यात आली असल्याचा खुलासा मार्च महिन्यात भाजपचे गटनेते अशोक शेळके यांनी केला होता. या प्रकरणामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ करणार पुन्हा एकदा उघडकीस आला. या प्रकरणाशी संबंधित विविध चित्रफिती आणि छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर पालिकेकडून अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीमध्ये मुख्य लेखापरीक्षक दिनकर जाधव, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अभिजित मेंगडे आणि वैद्यकीय आरोग्य उप-आयुक्त स्वाती देशपांडे यांचा समावेश होता.
या समितीने रुग्णालयातील औषध भांडाराची तपासणी करून वापरात असलेली औषधे आणि मुदत संपलेली औषधे एकाच ठिकाणी ठेवण्यात आली असल्याची तसेच १० विविध प्रकारची औषधे कालबाह्य झाल्याचे आपल्या अहवालातून स्पष्ट केले होते. तसेच दोन वैद्यकीय अधिकारी आणि सात ठेका औषध निर्माते कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तर महिना उलटून गेल्यानंतर आता यापैकी तीन औषध निर्मात्यांवर (फार्मसिस्ट) कारवाई करण्यात आली आहे.
यापैकी रोहिणी पाटील या महिला कर्मचाऱ्यांची बदली सर डी एम पेटिट रुग्णालयातून सामान्य रुग्णालय जूचंद्र येथे, जितेंद्र पाटील या कर्मचाऱ्याची बदली वैद्यकीय आरोग्य विभाग मुख्यालयातून विजयनगर तुळींज रुग्णालय आणि कल्पिता चौधरी या महिला कर्मचाऱ्याची बदली वैद्यकीय आरोग्य विभाग मुख्यालयातून माता बालसंगोपन केंद्र सर्वोदय वसाहत येथे करण्यात आली आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कारवाई केल्याचा उल्लेख पालिकेच्या पत्रकात करण्यात आलेला नाही.
नोटीस बजावलेले कर्मचारी कोण?
रोहिणी पाटील (औषध निर्माती, ठेका कर्मचारी)
समीक्षा धोंडे (औषध निर्माती, ठेका कर्मचारी)
सविता बाबिलवाड (औषध निर्माती, ठेका कर्मचारी)
कौसल्या वळवी (औषध निर्माती, ठेका कर्मचारी)
युवराज नवले (औषध निर्माता, ठेका कर्मचारी)
कुलदीप बोरसे (औषध निर्माता, ठेका कर्मचारी)
जितेंद्र पाटील (औषध निर्माता, ठेका कर्मचारी)
डॉ. राणी बदलानी (वैद्यकीय अधिकारी)
डॉ. भक्ती चौधरी (वैद्यकीय आरोग्य अधिकारी)
भाजपचे आंदोलन स्थगित
कालबाह्य औषध प्रकरणी भाजपकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्यामुळे भाजपचे गटनेते अशोक शेळके यांनी महाराष्ट्र दिनी महापालिका मुख्यालयात आमरण उपोषण पुकारण्याचा इशारा दिला होता. मात्र, पालिकेने दोषी कर्मचाऱ्यांपैकी तिघांवर कारवाई केल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
