वसई: वसई पूर्वेच्या गोखीवरे- रेंजनाका परीसरात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. ही समस्या दूर करण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेली वन विभागाची चौकी व मोठे वृक्ष स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात अडसर येत असलेले २२ वृक्ष व तेथील चौकी व अन्य अतिक्रमण हटविण्यात येणार आहेत. येत्या आठवडा भरातच हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे नियोजन समितीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

वसई पूर्वेच्या भागात गोखीवरे रेंजनाका परिसर आहे. याच भागातून वसई विरार शहर व मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे मुख्य रस्ते गेले आहेत. शहराच्या दृष्टीने दळणवळण करण्याचे मुख्य रस्ते असल्याने येथून वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. मागील काही वर्षात वसईसह रेंज नाका, वालीव, सातीवली, भोयदापाडा या भागातील नागरीकरण व औद्योगिक क्षेत्र ही विस्तारले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. याचा फटका नोकरदार वर्ग, सर्वसामान्य प्रवासी, शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवेला बसत असतो.

गोखीवरे रेंजनाका परिसरात सातीवली फाटा व वसई फाटा असे जोडणारे तीन रस्ते एकत्र येतात. मात्र, रेंजनाक्याजवळचा भाग वाहनांना ये-जा करण्यासाठी फारच अरुंद आहे. त्यामुळे या भागात सातत्याने कोंडी होत असून रेंजनाका परिसर हा वाहतूक कोंडीचे केंद्र बनला आहे. त्यावर उपाययोजना म्हणून महापालिकेने सिग्नल यंत्रणा लावली आहे. मात्र, तरीही कोंडी नियंत्रण हाताबाहेर गेले आहे. येथील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी यासाठी रस्त्याच्या कडेला असलेली वनविभाग चौकी व मोठी झालेली वृक्ष यांचा अडथळा जर दूर केला तर रस्त्याचे रुंदीकरण करून येथील कोंडीचा प्रश्न मिटवता येणार आहे. या कोंडीबाबत जुलै २०२५ मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार विलास तरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर चौकी, वृक्ष स्थलांतर व अन्य अतिक्रमण बाजूला करण्यात यावे अशा सूचना पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिल्या होत्या. त्यानुसार वन विभाग व महापालिका यांच्यामार्फत या कामाला सुरुवात ही करण्यात आली होती.

आठवडा भरात प्रश्न मार्गी लावणार

४ फेब्रुवारी २०२६ रोजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी पुन्हा एकदा या प्रश्नावर चर्चा करण्यात आली यात रेंज नाका येथे २२ झाडे बाधित होत आहेत. यासाठी महापालिकेने १ लाख ८ हजार ८९७ रुपये इतका निधी वनविभागाकडे भरला आहे. वनविभागाकडूनही येत्या आठवडाभरात तेथील चौकी व वृक्ष काढून टाकण्यात येतील असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले.