वसई:- वसई पूर्वेकडील अत्यंत वर्दळीचा भाग मानल्या जाणाऱ्या गोखीवरे रेंज नाका परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीने उग्र रूप धारण केले आहे. सकाळी कामावर जाण्याच्या आणि संध्याकाळी परतण्याच्या वेळी या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने चाकरमानी, विद्यार्थी आणि औद्योगिक वसाहतीतील कामगारांचे प्रचंड हाल होत आहेत.बुधवारी सकाळी सुद्धा यभागात वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.
वसई पूर्वेच्या भागात गोखीवरे रेंज नाका परिसर आहे. याच भागातून वसई विरार शहर व मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे मुख्य रस्ते गेले आहेत. शहराच्या दृष्टीने दळणवळण करण्याचे मुख्य रस्ते असल्याने येथून वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. मागील काही वर्षात वसईसह रेंज नाका, वालीव, सातीवली, भोयदापाडा या भागातील नागरीकरण व औद्योगिक क्षेत्र ही विस्तारले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे.
मागील काही दिवसांपासून या गोखीवरे ते रेंज नाका परिसरात प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास ही रेंज नाका ते गोखीवरे भागात दोन्ही बाजूच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीचा मोठा फटका नोकरदार वर्ग, शाळकरी विद्यार्थी यांना बसला आहे.
एकीकडे कडाक्याच्या उन्हाच्या झळा तर दुसरीकडे वाहतूक कोंडीचा त्रास त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत.
वाहतूक पोलिसांकडून कोंडी सोडवण्याचे काम सुरू होते मात्र वाढती वाहनांची गर्दी त्यात विरुद्ध दिशेने येणारी वाहन त्यामुळे कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांची ही चांगलीच दमछाक झाली.
रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे कोंडी
वसई पूर्वेच्या गोखीवरे- रेंज नाका परीसरात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. ही समस्या दूर करण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेली वन विभागाची चौकी व मोठे वृक्ष स्थलांतरीत करण्याचे निर्देश पालकमंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार आता रेंज नाका जवळील चौकीजवळ वृक्ष स्थलांतर व रस्त्याचे रुंदीकरण अशी कामे सुरू करण्यात आल्याने ही वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
