Vasai Virar Election Updates:वसई पूर्वेच्या वसंतनगरी येथील प्रभाग क्रमांक २२ मधील शेठ विद्यामंदिर मतदान केंद्रावर भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला. यावेळी गोंधळ नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
वसई विरार शहरात आज महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. ९ प्रभागात मतदान प्रक्रियेसाठी शहरात १ हजार ३३५ मतदान केंद्र उभारण्यात आली होती. शासनाने जाहीर केलेली सुट्टी आणि महापालिकेने दिलेल्या विविध सवलती यामुळे सकाळी ७ वाजल्यापासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी करायला सुरुवात केली आहे. पण मतदार याद्यांमधला घोळ, सातत्याने बंद पडणारी मतदान यंत्र, वाहतूक कोंडी यामुळे मतदारांचे चांगलेच हाल झाले होते. सकाळी ७ ते संध्याकाळी ५.३० या कालावधीत कोणत्याही गडबड गोंधळाशिवाय मतदान पार पडले.
पण, मतदानाची वेळ संपल्यानंतर मात्र वसई पूर्वेतील एका केंद्रात भाजप कार्यकर्ते आणि निवडणूक अधिकारी यांच्यात वाद झाल्याचे दिसून आले. वसई पूर्वेच्या भागात प्रभाग क्रमांक २२ मध्ये शेठ विद्यामंदिर आहे. या शाळेत उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रावर भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. बाविआ कार्यकर्त्यांना मतदान केंद्रावर सोडण्यात आल्याने हा गोंधळ घातला होता. त्यामुळे मोठी गर्दी येथे जमली होती. यावेळी हा गोंधळ नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. तर पोलिसांनी केलेल्या लाठी चार्ज बाबत भाजप कार्यकर्त्यांकडून
तसेच प्रतिनिधींकडून संताप व्यक्त केला जात आहे. यावेळी भाजप नेते आणि खासदार हेमंत सवरा यांनी घटनास्थळी भेट देत या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले खासदार?
संध्याकाळी ५.३० वाजता मतदानाची वेळ संपल्यावर मतदान केंद्राजवळ आम्हाला दुसऱ्या गेटजवळ आम्हाला संशयास्पद हालचाल दिसली. एक गाडी येताना आमच्या उमेदवारांना दिसली. याबद्दल जेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांना विचारले तेव्हा समर्पक उत्तर मिळाले नाही. तसेच या केंद्राजवळ २५ जणांचा घोळका दिसला. हा घोळका पाहिल्यानंतर आमच्या उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना केंद्रात जाऊ देण्याची विनंती केली. पण, त्यानंतर अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले व संशयित घोळक्यावर कारवाई करण्याऐवजी आमच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याची प्रतिक्रिया खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी दिली आहे.
तसेच, या ठिकाणी तथाकथित लोकप्रतिनिधी येऊन दबाव तंत्राचा वापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदान केंद्रात गेलेल्या त्या २५ माणसांची चौकशी व्हावी. त्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासावेत अशी मागणी खासदार सवरा यांनी केली आहे. तसेच याप्रकरणी तक्रार दाखल करण्याची व लाठीचार्जची परवानगी नसताना लाठीचार्ज केल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
