वसई: वसई पूर्वेच्या गोखीवरे जवळील रेंज नाका परीसरात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
या वाहतूक कोंडीचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. या वाहतूक कोंडीच्या समस्येला कंटाळलेल्या एका तरुणाने व्हिडीओ बनवत ही कोंडी सोडवेल त्याला ५०१ , रुपयांचे पारितोषिक जाहीर करत या वाहतूक कोंडी बाबत संताप व्यक्त केला आहे. याबाबतची व्हिडीओ ही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
वसई पूर्वेच्या भागात गोखीवरे रेंज नाका परिसर आहे.
याच भागातून वसई विरार शहर व मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे मुख्य रस्ते गेले आहेत. शहराच्या दृष्टीने दळणवळण करण्याचे मुख्य रस्ते असल्याने येथून वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. मागील काही वर्षात वसईसह रेंज नाका, वालीव, सातीवली, भोयदापाडा या भागातील नागरीकरण व औद्योगिक क्षेत्र ही विस्तारले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. याच फटका नोकरदार वर्ग, सर्वसामान्य प्रवासी,शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवेला अधिकच बसत असतो.
रेंज नाका परिसरात तीन रस्ते एकत्रित येतात. मात्र दोन्ही बाजूने रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते. वाहतूक नियंत्रणात राहावी यासाठी पालिकेने सिग्नल यंत्रणा ही बसविली आहे.तरीही कोंडी नियंत्रणात येत नाही.विशेषतः सकाळ आणि संध्याकाळ अशा वेळी तर जास्तच कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.या सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येने नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत.
रेंज नाक्याच्या कोंडीला त्रस्त झालेल्या तरुणाने येथील व्हिडीओ शेअर करीत येथील समस्येवर प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
रेंज नाक्यावर सातत्याने कोंडी असते या कोंडीत दररोज सर्वसामान्य नागरिकांना जवळपास पंधरा ते वीस मिनिटं तर कधी अधिक काळ अडकून राहावे लागते.ही कोंडी जो सोडवेल त्याला माझ्या कडून पारितोषिक दिले जाईल असेही त्याने या व्हिडीओतून सांगितले आहे. यापूर्वी १०१ रुपये पारितोषिक होते आता यात वाढ करून ५०१ रुपये पारितोषिक दिले जाईल अशी घोषणा त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे.
ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाली होती चर्चा
४ फेब्रुवारी २०२६ रोजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती.यावेळी पुन्हा एकदा या प्रश्नावर चर्चा करण्यात आली यात रेंज नाका येथे २२ झाडे बाधित होत आहेत. यासाठी महापालिकेने १ लाख ८ हजार ८९७ रुपये इतका निधी वनविभागाकडे भरला आहे. वनविभागाकडूनही येत्या आठवडाभरात तेथील चौकी व वृक्ष काढून टाकण्यात येतील असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले होते. मात्र त्यावर पुढील उपाययोजना न झाल्याने कोंडीची समस्या कायम आहे.
