वसई: वसई पूर्वेतील सातिवली आणि तारकेनगर परिसराला सध्या अस्वच्छतेचा मोठा विळखा पडला आहे. अस्वच्छ सार्वजनिक शौचालये, कचऱ्याचे ढीग आणि तुंबलेले नाले यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरातील वाढती दुर्गंधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या भागात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वसई पूर्वेला सातिवली आणि तारकेनगर परिसर आहे. कामगार आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्या वस्तीचा परिसर म्हणून या भागाची ओळख आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या भागात विविध ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचरा वेळेवर उचलला जात नसल्यामुळे तसेच कचरापेट्यांची योग्य ती सोय नसल्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. या कचऱ्यमुळे दुर्गंधी पसरली असून भटक्या कुत्र्यांचा वावरही वाढला आहे.

त्यातच परिसरातील नाले कचऱ्याने पूर्णपणे तुंबले आहेत. तसेच आसपासच्या औद्योगिक वसाहतीतून विना प्रक्रिया बाहेर पडणारे रसायनयुक्त पाणी आणि प्रक्रियेविना नाल्यात सोडले जाणारे सांडपाणी यामुळे परिसरातील डासांची उत्पत्ती वाढली असून बेंजो आणि मलेरिया सारख्या आजारांची भीती देखील नागरिकांमध्ये पसरली आहे.

सर्वात बिकट अवस्था येथील सार्वजनिक शौचालयांची झाली आहे. अनेक दिवसांपासून या शौचालयांची स्वच्छता करण्यात आलेली नाही. दुर्गंधीमुळे नागरिकांना शौचालयांचा वापर करणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी पाण्याची सुविधा नाही, तर काही ठिकाणी दुरवस्था झाल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत.

तसेच काही शौचालयांच्या दरवाजाच्या कड्या तुटल्यामुळे तसेच काही दरवाजे निखळून पडण्याच्या अवस्थेत असल्यामुळे लहान मुले आणि खासकरून महिला यांना या शौचालयाचा वापर करणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापन आणि नालेसफाईचे कंत्राट दिलेल्या संस्था नेमके काय काम करत आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

यापूर्वी प्रशासकीय राजवट असल्यामुळे वसई पूर्वेतील परिसरांच्या स्वच्छतेकडे आणि देखभाल दुरुस्ती कडे लक्ष देता आले नाही. मात्र, आता याबाबत पाठपुरावा केला जाईल.-रमेश घोरकना, नगरसेवक