वसई: उन्हाची तीव्रता अधिक वाढली असतानाच वसई पूर्वेच्या भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने आता या आदिवासी पाड्यातील भागात तात्पुरता स्वरुपात नदीत खड्डे मारून त्यातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. वसई विरार शहरात पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सुर्या प्रकल्प, पेल्हार, उसगाव, एमएमआरडीए अमृत योजना अशा विविध योजनेतून प्रतिदिन ३५० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होत असले तरी पालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ग्रामीण भागात अजूनही पाणी पोहचले नसल्याने पाण्यासाठी या नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे.
यात विशेषतः प्रभाग समिती जी अंतर्गत येणाऱ्या कामण, देवदळ, कोल्ही, चिंचोटी, बेलकडी यासह अन्य आदिवासी पाड्यांच्या ठिकाणी पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी शासनाने योजना राबविल्या मात्र त्या कार्यान्वित न झाल्याने आज या भागात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे.मुबलक पाणी मिळावे सातत्याने पालिके कडे पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र तरी सुद्धा उपाययोजना केल्या जात नाही असे सामाजिक कार्यकर्ते दिनेश म्हात्रे यांनी सांगितले आहे.
उन्हाचा पारा वाढत असताना येथील पाण्याची समस्या अधिक भीषण होत आहे. विशेषतः कामण परिसतील बेलकडी पाडा व इतर पाड्यात बहुसंख्य आदिवासी समाज राहत असलेल्या भागात कोणतीही पाणी पुरवठ्याची सुविधा नसल्याने अडचणी येत आहेत. यासाठी सामाजिक कार्यकर्ते दिनेश म्हात्रे व माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे यांच्या सहकार्याने या भागात जेसीबीच्या साहाय्याने खड्डे मारून पिण्यासाठी व वापरासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या खड्ड्यात पाणी जमा होते ते पाणी नितळ झाल्यानंतर त्या पाण्याचा वापर करून आपली तहान भागवत आहेत. प्रशासनाने येथील पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी ही येथील नागरिक करीत आहेत.
