वसई: वाढते प्रदूषण व वाढत्या इंधनाच्या किंमती यामुळे विद्युत गाड्यांना नागरिकांकडून पसंती दिली जात आहे. मात्र वसई पश्चिमेच्या आनंदनगर परीसरात एका दुकाना शेजारी उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना सोमवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
वसई पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक २६ आनंदनगर भजनलाल दूधवाला यांच्या दुकानाशेजारी बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक दुचाकी उभी करण्यात आली होती. सोमवारी रात्री अचानकपणे या दुचाकीमधील बॅटरीचा स्फोट होऊन आग लागली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.
यावेळी दुकानाबाहेर कर्मचारी झोपलेले होते. ते ही सुरुवातीला घाबरले. मात्र त्यानंतर प्रसंगावधान राखत पेटलेली गाडी रस्त्याच्या बाजूला हलवून पाण्याची साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
या आग दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, स्फोटाचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. या घडलेल्या घटनेमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षेबाबत ही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
