वसई :- गेल्या काही काळापासून वसईच्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर पडणारा दरोडा आणि प्रशासकीय यंत्रणेची त्याकडे असलेली डोळेझाक यांविरोधात आता जनक्षोभ उसळला आहे. वाळू,मातीची बेकायदेशीर लूट व विकासाच्या नावाखाली हिरवाईची होणारी कत्तल थांबविण्यासाठी वसईतील जागरूक नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून येत्या शनिवारी, २५ एप्रिलला वसई तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे.

वसई विरार पट्ट्यातील पर्यावरणाची विविध मार्गाने हानी होऊ लागली आहे. गेल्या काही वर्षात खाडी पात्रात व किनार पट्टीच्या भागात अमर्याद वाळू उपसा, बेकायदेशीर मार्गाने होणारे मातीचे उत्खनन, बेकायदेशीर मातीभराव, नैसर्गिक जलस्रोत नष्ट करण्याचे प्रकार व मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्ष तोड यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी आणि पर्यावरणप्रेमींनी वेळोवेळी महसूल विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.

मात्र, प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्याऐवजी केवळ कागदी घोडे नाचवले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर, आता रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारण्याचे ठरवण्यात आले आहे. यासाठी २५ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता तहसीलदार कार्यालयावर पर्यावरण प्रेमीं व विविध सामाजिक संघटना यांच्या मार्फत आंदोलन छेडले जाणार आहे.

नैसर्गिक संपत्ती ही सर्वांची आहे, तिचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, असा संदेश देत आंदोलनातसहभागी होण्याचे आवाहन या आंदोलनाच्या आयोजकांकडून करण्यात आले आहे. प्रशासनाने वारंवार दिलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही नागरिकांनी दरम्यान, केला आहे.

या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण होण्याची शक्यता आंदोलनकर्त्या आयोजकांनी वर्तवली असून, बेकायदेशीर कृत्यांवर आळा बसावा अशी नागरिकांची देखील अपेक्षा असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक पर्यावरण वाचवण्यासाठी आता लोकशक्तीचा वापर करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनाकडे संपूर्ण वसई विरारचे लक्ष लागले असून, पुढील काळात प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.