वसई: खरीप हंगामात शेतीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलन, डंपर, आदी यंत्रांची मागणी वाढली आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे यंत्रांचे भाडेही वाढले आहे. यामुळे वसईतील शेतकऱ्यांना अधिक खर्चाचा भुर्दंड बसत आहे.
पाऊस अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्यामुळे वसई विरारमधील शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. माती परीक्षण, पूर्वमशागत, बांध बंदिस्ती, झाडांची छाटणी, शेतजमिनीवर तयार झालेले खाचखळगे बुजवून जमीन समपातळीत आणणे, शेतातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, बांधावर फळबाग लागवडीसाठी खड्डे घेणे अशी विविध कामे शेतकऱ्यांकडून केली जात आहेत.
पण, ही सर्व कामे वेळेत आणि जलद गतीने पार पाडण्यासाठी ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलन, डंपर आणि रोडरोलर यासारख्या आधुनिक यंत्रसामग्रीच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. तर दुसरीकडे सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरामुळे या यंत्रांच्या भाड्यातही मोठी वाढ झाली आहे. तर अचानक झालेल्या या भाववाढीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
मजुरांच्या कमतरतेमुळे यंत्रांच्या मागणीत वाढ
वसई तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम पूर्व तयारीसाठी मजुरांची गरज भासते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शेतीकामांसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रांवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, यंदा यंत्रांच्या भाड्यात लक्षणीय वाढ झाल्याने हा खर्च शेतकऱ्यांना परवडेनासा झाला आहे.
यंत्रांचे नवे दर:
- ट्रॅक्टर – १ हजार रुपये प्रतितास
- जेसीबी – १२०० रुपये प्रतितास
- पोकलन – २ हजार रुपये प्रतितास
- डंपर – अंतरानुसार भाडे आकारणी
ऐन हंगामात पेट्रोल व डिझेलचे भाव सतत वाढत आहेत. शिवाय टंचाईदेखील आहे. त्यामुळे डिझेलसाठी वणवण फिरावे लागते. कधी कधी डिझेलअभावी काम बंद ठेवावे लागत आहे. इंधन दरवाढीमुळे नाइलाजाने आम्हाला भाड्यातदेखील वाढ करावी लागली आहे. परिस्थितीच तशी निर्माण झाली आहे. मात्र, ग्राहकदेखील समजून घेऊन वाढीव दर देत आहेत. – रूपेश पाटील, जेसीबी व्यावसायिक
