वसई: “वसईकरांच्या घरात पिण्याचे पाणी नाही; पण पावसाचे पाणी मात्र घरात शिरते ही वसईची आजची परिस्थिती खूप चिंताजनक आहे”, असे प्रतिपादन स्व. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या द्वितीय स्मृतिदिन कार्यक्रमात पर्यावरण तज्ज्ञ आणि अभ्यासक मॅकेन्झी डाबरे यांनी केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, विचारवंत साहित्यिक आणि हरित वसई चळवळीचे प्रणेते स्व. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या दुसऱ्या वार्षिक स्मृतिदिनानिमित्त शनिवार, २५ जुलै रोजी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे कुटुंब आणि प्रबोधन प्रतिष्ठानच्यावतीने प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वसईतील पाणी समस्या आणि पूरसमस्या या विषयावरील अभ्यासपूर्ण चिंतन मॅकेन्झी डाबरे यांनी श्रोत्यांसमोर मांडले. तसेच वसईच्या अनिर्बंध विकासामुळे ओढवलेली दुरवस्था आकडेवारीसह त्यांनी स्पष्ट केली.
पंचवीस तीस वर्षांपूर्वी जेमतेम दोन अडीच लाख लोकसंख्या असलेला वसई तालुका आज तीस लाखाहून अधिक लोकांचा भार सहन करत आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी, वीज , रस्ते, वाहतूक यंत्रणा आणि पाणी निसाःरण व्यवस्था या सर्वच पायाभूत व्यवस्थेवर कमालीचा ताण आला आहे. येत्या काही वर्षांत ही लोकसंख्या सत्तर लाखाच्या घरात जाण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
या संकटाची चाहूल फादर दिब्रिटो यांनी पस्तीस चाळीस वर्षांपूर्वीच लागली होती. पायाभूत सोयी विकसित करून मगच वसईच्या नागरिकरणाला हात घालावा अशी त्यांची मागणी किती योग्य होती हे आज लक्षात येते. त्यांनी उभारलेल्या लढ्यामुळेच आज वसईचा पश्चिम पट्टा काही प्रमाणात का होईना हिरवा राहिला आहे. तो कायम हिरवाच राहील यासाठी लोकप्रतिनिधींसोबत सर्व सामान्य जनतेनेही सतर्क राहायला हवे आणि नागरिकरणाचे संकट थोपवून धरायला हवे असे आवाहनही त्यांनी केले.
फादर रेमंड मच्याडो यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना फादरांच्या प्रेरणादायी कार्याचा थोडक्यात आढावा घेऊन फादरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली तसेच या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना नंदाखाल धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फादर डॅाम्निक डिआब्रिओ ह्यांनी फादरांसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. फादरांच्या बहुविध कार्याचा उल्लेख करून फादरांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू त्यांनी उलगडून दाखवले. या कार्यक्रमासाठी वसई परिसरातील सर्व जातिधर्मातील फादरांचे असंख्य अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठ धर्मगुरू आणि साहित्यिक फादर ॲन्ड्र्यू रॅाड्रिग्ज , कवी सायमन मार्टिन, भरत पेंढारी तसेच सुवार्ता परिवारातील फादर दिब्रिटोंचे सहकारी उपस्थित होते.
स्व. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांच्या कुटुंबाने आणि प्रबोधन प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सुमारे शंभर झाडे लावून ती वाढविण्याचा निर्धार व्यक्त करत फादरांना आगळी वेगळी श्रद्धांजली अर्पण केली. प्रबोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष फ्रान्सिस डिमेलो व इजाबेल परेरा यांनी आभार प्रदर्शन केले.
