वसई: दिवाळीच्या निमित्ताने मिठाई यासह विविध प्रकारच्या फराळाला मोठी मागणी असते. काही वेळा भेसळयुक्त पदार्थांचा वापर करतात. अशी भेसळखोरी रोखण्यासाठी अन्न औषध प्रशासनाने कंबर कसली असून तपासणी मोहीम सुरू केली आहे. नुकताच वसईत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पथकाने एका खाद्यतेलाच्या एका युनिट वर छापा टाकून सुमारे सुमारे २६ लाख रुपये किंमतीचे साडेचौदा टन संशयास्पद खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे.

दिवाळीच्या सणानिमित्ताने वसई विरार शहरातील मिठाई यासह अन्य पदार्थांची दुकाने बहरून गेली आहे. विशेषतः या काळात मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते यासाठी तयार करण्यासाठी काही वेळा मिठाई विक्रेते भेसळयुक्त पदार्थांची सर्रास पणे विक्री करीत असल्याचे प्रकार घडतात. तर दुसरीकडे नकली पनीर, दुग्ध युक्त पदार्थ, फरसाण तळण्यासाठी पुनर्वापर केलेल्या तेलाचा वापर, पुनर्वापर केलेल्या खाद्यतेलाची विक्री तर काहीवेळा बुरशी जन्य पदार्थ यांची सुद्धा विक्री होत असते. 

अशा प्रकारच्या भेसळीमुळे शहरातील नागरिकांची फसवणूक  होते. याशिवाय त्याचा मोठा परिणाम हा नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. अशा प्रकाराला रोखण्यासाठी अन्न औषध प्रशासनाने कंबर कसली आहे. वसई विरार शहरात चार पथके नियुक्त केली आहेत. असे अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त व्यंकटेश चव्हाण यांनी सांगितले आहे. नुकताच अन्न प्रशासनाच्या पथकाने वसईतील एका रिपॅकिंग युनिटवर अचानक छापा टाकला. या तपासणीत रिफाइंड पामोलिन तेल पॅक करण्यासाठी जुन्या आणि वापरलेल्या डब्यांचा सर्रास वापर केला जात असल्याचे उघडकीस आले.

या कारवाईत तब्बल २६ लाख ११ हजार ७२४ रुपये किमतीचा १४,४९५ किलो (साडेचौदा टन) संशयास्पद खाद्यतेलाचा साठा जप्त करून पथकाने तेथून रिफाइंड पामोलिन, रिफाइंड सोयाबीन आणि रिफाइंड राइस ब्रान तेलाचे नमुने घेऊन उर्वरित सर्व साठा कमी दर्जाचा असल्याच्या संशयावरून पुढील आदेशापर्यंत सील केला आहे असे सहायक आयुक्त व्यंकटेश चव्हाण यांनी सांगितले आहे.

मिठाईच्या दुकानांवर छापेमारी

नालासोपारा येथील एका नामांकित ड्रायफ्रुटच्या पेढीवर धाड टाकण्यात आली. यात विविध प्रॉडक्ट कोडचे मिक्स ड्रायफ्रूट बॉक्सेस जप्त करण्यात आले. एकूण २ लाख ४४ हजार रुपये किंमतीचा ९४.९७ किलोचा साठा जप्त केला आहे. अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ च्या कलम २३, २६ व २७ चे उल्लंघन करून मिसब्रँडेड व निकृष्ट दर्जाचा असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला आहे. सहायक आयुक्त व्यंकटेश चव्हाण व डॉ. सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी ऐश्वर्या शिरसाट यांनी केली आहे.