वसई: अपघात किंवा आजारपणामुळे रस्त्यावर तडफडणाऱ्या मुक्या जनावरांना आणि पाळीव प्राण्यांना आता वेळेत उपचार मिळणे सोपे होणार आहे. वसईमध्ये ‘अरहम युवा सेवा ग्रुप’ या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने पशु-प्राण्यांसाठी विशेष रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण वसई परिसरातील प्राण्यांसाठीची ही पहिलीच अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवा ठरली आहे.
ही सेवा अरहम युवा सेवा ग्रुपचे नम्र महाराज व त्यांच्या सहकारी यांच्या मदतीने सुरू करण्यात आली आहे. रविवारी या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा वसई पश्चिमेच्या स्वामी नारायण मंदिर परिसरात पार पडला. यावेळी वसई विरार महापालिकेचे महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस, माजी महापौर नारायण मानकर, नम्र महाराज व गुजराती परिवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
अनेकदा रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना, मांजरींना किंवा इतर प्राण्यांना अपघात होतो. मात्र, वेळेत रुग्णवाहिका किंवा वैद्यकीय मदत न मिळाल्याने अनेक मुक्या जीवांना आपले प्राण गमवावे लागतात. हीच अडचण ओळखून ‘अरहम युवा सेवा ग्रुप’ने हे महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या रुग्णवाहिकेमुळे जखमी प्राण्यांना तातडीने घटनास्थळी जाऊन प्रथमोपचार देणे किंवा त्यांना पुढील उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात पोहोचवणे वेळेत शक्य होणार आहे.
या रुग्णवाहिकेत अत्याधुनिक सेवा सुविधा दिल्या जाणार असून प्राथमिक उपचारासाठी डॉक्टर ही उपलब्ध असणार आहे. या सेवेसाठी ७६६२००५४०९ हा हेल्पलाईन क्रमांक ही सुरू करण्यात आला असून त्यावर संपर्क करून प्राण्यांसाठीच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे. अरहम युवा सेवा ग्रुपच्या या संवेदनशील उपक्रमाचे वसई-विरारमधील प्राणिमित्रांनी आणि नागरिकांनी कौतूक केले आहे.अरहम या संस्थेच्या माध्यमातून प्राण्यांसाठी रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. हा संस्थेचा चांगला उपक्रम आहे.
प्रत्येक ठिकाणी अशी सेवा सुरू पाहिजे. मानव सेवा अनेक जण करीत असतात. मात्र पशुसेवा ही कमी लोकं करीत असतात. जे पशुसेवक आहेत त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते अशात ही सुरू झालेली सेवा दिलासा देणारी आहे.- अजीव पाटील, महापौर वसई विरार महापालिका
