scorecardresearch

वाढवण बंदराविरोधात वसईतील मच्छीमारांचा आक्रोश ; पाचूबंदर, अर्नाळा येथे मच्छीमार बांधवांचे भव्य आंदोलन

पालघर जिल्ह्यात तयार करण्यात येणारे वाढवण बंदर रद्द करण्यात यावे या मागणीसाठी वसई-विरारमधील मच्छीमार बांधवही आक्रमक झाले आहेत.

वसई : पालघर जिल्ह्यात तयार करण्यात येणारे वाढवण बंदर रद्द करण्यात यावे या मागणीसाठी वसई-विरारमधील मच्छीमार बांधवही आक्रमक झाले आहेत. रविवारी पुन्हा एकदा पाचूबंदर, अर्नाळा येथे मोर्चा काढत या बंदराविरोधातील आक्रोश व्यक्त केला गेला.वाढवण बंदर प्रकल्पामुळे किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या मच्छीमार बांधवांचा पारंपरिक मच्छीमारी व्यवसाय अडचणीत येणार आहे. प्रकल्पाचा परिणाम जैवविविधतेवर होऊन माशांच्या प्रजातींनाही धोका निर्माण होणार असल्याची भीती आहे. यामुळे स्थानिक मच्छीमार बांधवांचे जनजीवन विस्कळीत होईल, यासाठी मागील काही वर्षांपासून वसईसह ठिकठिकाणचे मच्छीमार बांधव यास तीव्र विरोध करत आहेत.

प्रशासनाकडून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने पुन्हा एकदा मच्छीमार बांधव आक्रमक झाले आहेत. रविवारी गांधी जयंतीदरम्यान पुन्हा एकदा वाढवण बंदराविरोधात वसई मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्थेतर्फे आंदोलन करण्यात आले. या वेळी कोळी महिलांनी बंदराविरोधात जोरदार घोषणा दिल्या. दरम्यान, हे वाढवण बंदर झाल्यास, त्याचे मच्छीमारांवर काय विपरीत परिणाम होतील, याची माहिती संस्थेचे संचालक मिल्टन सौदिया यांनी दिली. तर बंदराविरोधातील पुढील लढाई सर्वाना सोबत घेऊन रस्त्यावर लढली जाईल, असा इशारा चेअरमन संजय कोळी यांनी दिला. अर्नाळा कोळी वाडय़ातही सर्व मच्छीमार बांधवांनी एकत्र येऊन मोर्चा काढला आणि वाढवण बंदराला आपला विरोध दर्शवला.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या