वसई : ​मागील दोन ते अडीच महिन्यांपासून मच्छीमारांनी आपल्या बोटी समुद्रकिनारी नांगरून ठेवल्या होत्या. १५ ऑगस्टपासून नवीन मासेमारीच्या हंगामाला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर बोटी सज्ज करण्यासाठी मच्छीमार बांधवांची मोठी लगबग सुरू असल्याचे चित्र वसई परिसरात दिसून येत आहे. ​वसई पश्चिमेतील अर्नाळा, वसई, नायगाव, पाचूबंदर आणि किल्लाबंदर या भागातील मोठ्या संख्येने कोळी बांधव मासेमारीचा व्यवसाय करतात. यासाठी मच्छीमार बांधव आपल्या बोटी खोल समुद्रात घेऊन जातात व त्या ठिकाणी १५ दिवस ते एक महिना राहून मासेमारी करतात.

​दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यापासून या मच्छीमारांच्या बोटी समुद्रात जातात आणि पुढील जवळपास ८ ते १० महिन्यांच्या कालावधीसाठी ही मासेमारी चालते. याच पार्श्वभूमीवर वसईतील मच्छीमारांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मासेमारीला जाण्यासाठी बोटींची आवश्यक डागडुजी करणे, माशांसाठी लागणारा बर्फ, विणलेली जाळी, बोटीचे इंधन आणि महिनाभरासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची जमवाजमाव अशी कामे वेगाने हाती घेण्यात आली असून सर्व साहित्य बोटींमध्ये चढवले जात असल्याचे मच्छीमार बांधवांनी सांगितले.

​परवाना वितरण सुरू

​वसई-विरारच्या समुद्र किनारपट्टी भागात ६०० हून अधिक बोटी आहेत. नव्या नियमांनुसार आता १२ सागरी (नॉटिकल) मैलांच्या पलीकडील आणि अलीकडील अशा दोन प्रकारच्या मासेमारी परवान्यांचे वितरण केले जात आहे. परवाना अधिकारी विनोद लहारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भागात एकूण ६२७ परवानाधारक बोटी असून त्यापैकी आतापर्यंत ३३० बोटींना परवाने मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित बोटींना परवाने वितरित करण्याचे काम अजूनही वेगाने सुरू आहे.

​पारंपरिक मासेमारांची फसवणूक केल्याचा आरोप.

​महाराष्ट्र शासनाने १५ ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदी जाहीर केल्याने हजारो पारंपरिक मच्छीमारांनी त्यानुसारच आपले नियोजन केले होते. मात्र, ऐनवेळी १ ऑगस्टपासून १२ सागरी मैलांपलीकडे मासेमारीला परवानगी दिल्याने, आधीच सज्ज असलेल्या बड्या नौकामालकांना १५ दिवसांचा थेट फायदा झाला. मत्स्यसंपदेच्या संवर्धनासाठी असणाऱ्या या बंदीचा फटका मात्र केवळ पारंपरिक मच्छीमारांनाच सोसावा लागत असल्याचा आरोप मच्छीमार बांधवांनी केला आहे. या निर्णयातून पारंपरिक मासेमारांची स्पष्ट फसवणूक झाली असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश फिशरमन काँग्रेसचे समन्वयक मिल्टन सौदीया यांनी केला आहे.