वसई: वसई पूर्व येथील वसंत नगरी भागात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत वाहून जाणाऱ्या दोन कारमधील तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. बुधवार, ८ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास ही थरारक सुटका करण्यात आली.
मागील काही दिवसांपासून वसई विरार शहरात मुसळधार पाऊस सुरू असून वसंत नगरी आणि एव्हर शाईन भागातील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले असतानाही काही वाहनचालक पाण्यातून वाहने काढण्याचे धाडस करत आहेत. रात्रीचा अंधार असल्याने चालकांना रस्त्याचा आणि पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही त्यामुळे गाड्या या पुराच्या पाण्यात अडकल्या होत्या.
या घटनेची वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी दाखल होऊन कर्मचाऱ्यांनी तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. एक मारुती आर्टिका कार पुराच्या पाण्यात वाहून जात होती. आधी कारचालकाला सुखरूप बाहेर काढले आणि नंतर दोरखंड व रेस्क्यू साहित्याच्या साहाय्याने कार पाण्यातून बाहेर काढली.
हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असतानाच, दुसरी एक फोर व्हीलर कार त्याच ठिकाणाहून जात असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहू लागली. जवानांनी तात्परता दाखवत तात्काळ त्या गाडीकडे धाव घेतली आणि गाडीतील दोन व्यक्तींची सुखरूप सुटका केली. दोन्ही गाड्या आणि त्यातील तिन्ही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
सखल भागात आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्यास वाहन चालकांनी पाण्यातून वाहने नेण्याचे धाडस करू नये. अंधार असल्यास पाण्याचा आणि रस्त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन अग्निशमन विभागाकडून करण्यात आले आहे.
