वसई: गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई परिसरात निर्माण झालेल्या भयावह पूरस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठी तत्परता दाखवली आहे. जवानांनी पुरात अडकलेल्या तब्बल ७३८ नागरिकांची सुखरूप सुटका केली असून, यामध्ये अत्यंत संवेदनशील परिस्थितीत असलेल्या ११ गर्भवती महिलांचाही समावेश आहे. या महिलांना सुरक्षित स्थळी हलवून प्रशासनामार्फत वेळेवर वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली.
शहरात मागील आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू असून अवघ्या सहा दिवसांत जवळपास १ हजार मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. यामुळे अनेक सखल भाग, नागरी वस्त्या आणि गावे पाण्याखाली गेली होती. विशेषतः सकवार, अर्नाळा, चांदीप, मिठागर वस्ती, वसंत नगरी, विरार, नायगाव, उमेळे परिसर आणि वसई मधुबन या भागात नागरिक पुरात अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी या सर्व ठिकाणी धाव घेऊन नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले.
एकीकडे शेकडो नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असले, तरी या पुरामध्ये पाण्यात बुडून ५ व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आपत्कालीन पथकाने शोधमोहीम राबवून या पाचही मृतदेहांना बाहेर काढले आहे. सध्या पूरस्थिती नियंत्रणात असली तरी हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्कालीन यंत्रणा चोवीस तास सतर्क ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी पूरसदृश भागात जाणे टाळावे आणि कोणत्याही आपत्कालीन मदतीसाठी त्वरित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
झाडे कोसळल्याने नुकसान, वीज पुरवठा खंडित
मुसळधार पावसामुळे शहरात तब्बल २०८ ठिकाणी झाडे कोसळली, तर १० ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. तसेच ३ ठिकाणी इमारतींचे स्लॅब आणि भिंती पडण्याच्या दुर्घटना घडल्या. या सर्व ठिकाणी आपत्कालीन पथकाने तात्काळ पोहोचून मदतकार्य सुरू केले. झाडे कोसळल्यामुळे काही ठिकाणी घरांचे आणि चाळींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच, काही भागांत झाडे वीजवाहिन्यांवर पडल्याने तारा तुटल्या असून वीज पुरवठा खंडित झाला आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई आणि मीरा-भाईंदर परिसरात झाड अंगावर कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे सतत सुरू असलेल्या या पाऊस आणि वाऱ्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
