वसई : ऐतिहासिक वसई किल्ल्याचा २८८ वा विजयोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विजयोत्सवात मशाल यात्रा, नरवीर चिमाची आप्पांच्या पुतळ्याचे पूजन, ढोल ताशा पथकांचे वादन, लेझीम पथकांचा नृत्याविष्कार व पारंपारीक वेशभूषा अशा विविध कलाकृती सादर करण्यात आल्या. याच उत्सवाच्या निमित्ताने हा ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला.
वसई विरार महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभाग v वसई तालुका कला-क्रीडा विकास मंडळ आणि वसई विजय स्मारक समिती यांच्या सहकार्याने १ ते ३मे या दरम्यान २८८ वा विजयोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. १ मे दुपारी साडेतीन वाजता वज्रेश्वरी मंदिरातून निघालेल्या मशाल यात्रेने या विजयोत्सवाला प्रारंभ झाला होता.
वज्रेश्वरीवरून मशाल यात्रा वसईच्या पारनाका येथे आल्यानंतर ढोल-ताशा पथक, लेझीम पथकांच्या जल्लोषपूर्ण गजरात मशाल यात्रा वसई किल्ल्यापर्यंत काढण्यात आली. तसेच मशाल शोभायात्रेत ढोल ताशा ,लेझीम, वेगवेगळ्या वेशभूषेतील कलाकार नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नरवीर चिमाजी अप्पा स्मारक पुजन व नरवीर चिमाजी अप्पा यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच गौतम बुद्धांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पअर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी वसई विरार महापालिकेचे महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस, माजी महापौर नारायण मानकर, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, विरोधीपक्ष नेते मनोज पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्यासह दुर्गप्रेमीं व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या १६ वर्षांपासून वसई विरार महापालिकेच्या माध्यमातून हा विजय दिन साजरा होत आहे. नरवीर चिमाजी आप्पांनी वसईतील सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याचे काम केलं आहे. ही संस्कृती व वारसा याचे जतन व्हावे यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे असे मत महापौर अजीव पाटील यांनी व्यक्त केले. येथील ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी महापालिकेचा प्रयत्न कायम राहणार आहे. यासाठी पुरातत्व विभागाचे सहकार्य मिळणे अपेक्षित आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
किल्ल्यांच्या प्रतिकृती, शस्त्र प्रदर्शनाने वेधले लक्ष
ऐतिहासिक किल्ल्याच्या विजयोत्सवाच्या निमित्ताने रायगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, प्रतापगड, मानगड यांसारख्या युनेस्को प्रमाणित किल्ल्यांच्या प्रतिकृती त्यासोबत पाचशेहून अधिक विविध प्रकारच्या शस्त्रांचे प्रदर्शन ही लक्षवेधी ठरले. या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने नागरिकांनी भेट देत ऐतिहासिक माहिती जाणून घेतली. ‘शिवरायांचे संरक्षण व्यवस्थापन’ या विषयावर व्याख्यान, किल्ला सफर यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम ही मोठ्या उत्साहात पार पडले.
