वसई: किल्ले वसई मोहीम परिवार या संस्थेतर्फे वसई किल्ल्यामध्ये पालघर जिल्ह्यातील पहिल्या वहिल्या प्राचीन खेळांच्या कार्यशाळेचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. आजच्या आधुनिक पिढीवर मोबाईल आणि इंटरनेटचा प्रभाव सातत्याने वाढत असताना, वसईत पार पडलेल्या या अनोख्या कार्यशाळेला लहान मुलांसह पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भारतीय प्राचीन खेळांची जपणूक व्हावी आणि नव्या पिढीला या पारंपरिक खेळांची गोडी लागावी, या मुख्य उद्देशाने वसई किल्ल्यात प्रथमच या विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रविवार, ३१ मे रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत वसई किल्ल्यातील ऐतिहासिक गोंसालो गार्सिया चर्चच्या प्रांगणात हा स्तुत्य उपक्रम पार पडला. “किल्ले वसई मोहीम परिवार” या संस्थेच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनात इथेल नितीन डिसोजा (वासळई), सुमित सावंत, दिलीप सावंत (डोंबिवली) आणि केंद्रीय पुरातत्व विभाग (वसई) यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यशाळेत डोंबिवली येथील प्रसिद्ध प्राचीन खेळ तज्ज्ञ व अभ्यासक कल्पना सावंत यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी भारतीय प्राचीन खेळांचा इतिहास व महत्त्व विशद करत उपस्थितांना प्रत्यक्ष खेळ खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली. या कार्यशाळेत त्यांनी शराव्यूह, नवकंकरी, अष्टचामा, चक्रव्यूह आणि वाघबकरी या पाच वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन खेळांचे सादरीकरण केले.
उपस्थित विद्यार्थ्यांनी या खेळांमध्ये व त्यानिमित्ताने आयोजित स्पर्धेत भाग घेत पारंपरिक खेळांचा मनमुराद आनंद लुटला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि उपस्थित मान्यवरांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, या सर्व प्राचीन खेळांच्या भव्य कापडी प्रतिकृती आगामी काळात तयार करण्याचे अत्यंत मोलाचे कार्य दर्शना दिलीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याची माहिती इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी यावेळी दिली.
आजच्या काळात लहान मुले मैदानी व पारंपरिक खेळांपासून दूर जाऊन मोबाईल गेम्सकडे अधिक आकर्षित होत आहेत. अशा कठीण परिस्थितीत हे प्राचीन खेळ मुलांची विचारशक्ती, रणनीती आखण्याची क्षमता आणि एकाग्रता वाढविण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात, असे मत प्राचीन खेळ अभ्यासक कल्पना सावंत यांनी व्यक्त केले. ऐतिहासिक वसई किल्ल्यात असा आगळावेगळा विनामूल्य उपक्रम आयोजित करून नव्या पिढीला प्राचीन भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद असल्याच्या भावना उपस्थित वसईकरांनी व्यक्त केल्या.
लवकरच महाराष्ट्रभर खेळ प्रदर्शन
प्राचीन खेळ अभ्यासक कल्पना सावंत व दर्शना सावंत यांनी अत्यंत मेहनतीने संकलित केलेल्या या दुर्मिळ प्राचीन खेळांचे भव्य प्रदर्शन लवकरच संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लहान मुलांना, विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना आपल्या या समृद्ध वारशाची जवळून माहिती मिळावी, यासाठी हे प्रदर्शन राज्यभर नेण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.
