वसई: प्राचीन खेळांच्या माध्यमातून मुलांमध्ये नियोजन, संयम आणि निर्णयक्षमता गुण रुजवण्यासाठी आणि प्राचीन खेळपरंपरा जपण्यासाठी वसई किल्ल्यात विविध प्राचीन खेळांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील हा असा पहिलाच प्रयोग असणार आहे.

भारताला हजारो वर्षांची प्राचीन खेळपरंपरा लाभली आहे. या खेळांमधून मनोरंजनाबरोबरच बुद्धिमत्ता, रणनीती, एकाग्रता आणि सामाजिक संवाद यांचा विकास होतो. भारतीय संस्कृतीतील अनेक खेळ आजही लोकपरंपरेत जिवंत असून त्यांचे जतन व संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यामुळे आताच्या पिढीमध्ये या खेळांचा प्रचार-प्रसार करण्याच्या दृष्टीने रविवार, ३१ मे रोजी वसई किल्ले मोहीम संस्थेतर्फे प्राचीन खेळांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते ११ वाजेदरम्यान वसई किल्ला इथे ही कार्यशाळा संपन्न होणार आहे.

यावेळी शराव्यूह, नवकंकारी, अष्टचामा, चक्रव्यूह आणि वाघबकरी यांसारख्या खेळांबाबत मार्गदर्शन आणि त्यांचे प्रात्यक्षिक वसई किल्ले मोहीमचे इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत करणार आहेत. याबाबत माहिती देताना श्रीदत्त राऊत म्हणाले की, “प्राचीन असलेल्या बैठ्या खेळांचा इतिहास हा विशेषतः प्राचीन भारतातील राजदरबार, गुरुकुल आणि सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित आहे. हे खेळ बुद्धी, नियोजन, संयम आणि निर्णयक्षमता वाढविणारे मानले जात. विविध प्रदेशांमध्ये स्थानिक स्वरूपात हे खेळ खेळले जात असून त्यातून सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन होत असे.”

“विविध भागातील लेण्या, गडकिल्ले, बौद्धस्तूप यांच्या भिंतींवर कोरलेले आराखडे आम्ही कापडावर उतरवले आहेत. तसेच त्याकाळी खेळ खेळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाच्या सोंगट्या, शंख-शिंपले, फळांच्या बियांचा वापर करणार आहोत. सुरुवातीच्या काहीवेळात खेळांबाबत माहिती दिली जाईल. मग प्रात्यक्षिके सादर केली जातील आणि शेवटच्या उरलेल्या कालावधीत ज्यांना पाचपैकी दोन खेळ तरी उत्तम खेळता येत असतील त्यांच्यात स्पर्धा लावली जाईल, अशी माहिती इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी दिली.

या कार्यशाळेसाठी प्रवेश शुल्क आकारले जाणार नसून भारतीय सांस्कृतिक वारसा आणि प्राचीन खेळांविषयी आवड असलेल्या सर्व नागरिकांनी या अनोख्या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी किल्ले वसई मोहीम परिवार यांच्याशी ९७६४३१६६७८ या क्रमांकावर संपर्क साधावा असेही आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.