वसई: शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक असणारा वसई किल्ला आणि तसेच पेशवे चिमाजीअप्पा स्मारक दिवाळीनिमित्त तीन हजार दिवे आणि शंभर मशालींनी उजळून निघाले आहे. वसई, विरार तसेच मुंबई, ठाणे, पालघरसारख्या विविध ठिकाणांहून एकत्र आलेल्या ४०० ते ५०० जणांनी प्रज्वलित केलेल्या पणत्यांनी तसेच फटाक्यांच्या आतषबाजीने किल्ला बंदरच्या परिसरात चैतन्य संचारले होते.

मराठ्यांच्या अधिपत्याखाली वसई किल्ला येण्यापूर्वी ४०० वर्षांपूर्वी पोर्तुगीज सत्ताधीशांची वसई किल्ल्यावर सत्ता होती. या काळात वसईतील गोरगरीब जनतेचा अमानुष छळ आणि पिळवणूक करण्यात आली. तर पोर्तुगीजांच्या जाचातून सामान्य जनतेची सुटका करण्यासाठी पेशवे चिमाजीअप्पा यांनी वसई किल्ल्यावर स्वारी केली आणि तब्बल ३ वर्ष चाललेल्या युद्धानंतर वसई किल्ला मराठ्यांनी जिंकला आणि वसई पोर्तुगीजांच्या जाचातून मुक्त झाली.

या युद्धात २१ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तर याच हुतात्म्यांना मानवंदना म्हणून तसेच दिवाळीच्या सणात मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा वसई किल्ला उजळून निघावा म्हणून दीपोत्सवाची सुरुवात करण्यात आली. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही आमची वसई आणि धर्मसभा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी संध्याकाळी वसई किल्ला आणि पेशवे चिमाजीअप्पा स्मारक परिसरात मोठ्या उत्साहात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या पंधरा ते सोळा वर्षांपासून वसईत दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे. यंदाच्या दीपोत्सवात वसई विरार येथील स्थानिक तसेच ठाणे, पालघर, मुंबई अशा विविध ठिकाणचे पर्यटक या दीपोत्सवात सहभागी झाले होते.

यावेळी जय भवानी, जय शिवाजी आणि जय वज्रेश्वरी, जय चिमाजी या जयघोषात पेशवे चिमाजी अप्पा स्मारक ते वसई किल्ला अशी शंभर मशाली घेऊन मिरवणूक काढण्यात आली. तर वसई किल्ल्यातीलतर प्रवेशद्वार, तटबंदी, सागरी दरवाजा, सतीचा पार, ध्वजस्तंभ, हनुमान मंदिर आणि नागेश महातीर्थ या किल्ल्यातील महत्त्वाच्या स्थळांवर तसेच पेशवे चिमाजी अप्पा स्मारकाभोवतालचा परिसर, प्रवेशद्वार  तीन हजार पणत्या, तोरण, कंदील लावून आणि रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता. 

शहरात सगळीकडे दिवाळी  साजरी होत असताना इतिहासाचा साक्षीदार असणारा वसईचा किल्ला मात्र अंधारात होता. हा तेव्हापासूनच हा दीपोत्सव साजरा करायचा आणि किल्ला दिव्यांनी उजळून टाकण्याचे आम्ही ठरवले. पेशवेकाळापासून हा दीपोत्सव साजरा होतोय आणि यंदाचा हा २८७ वा दीपोत्सव असल्याचे धर्मसभेचे धनंजयशास्त्री गुरुजी यांनी सांगितले.

शंभर आकाश कंदील सोडले…

वसईतील दीपोत्सवात अजून भर पडली ती कार्यक्रमावेळी करण्यात आलेल्या आतषबाजीने. यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे आणि तऱ्हेचे फटाके फोडण्यात आले. पेशवे चिमाजीअप्पा स्मारक आणि वसई किल्ला परिसरातून नागरिकांच्या हस्ते १०० हवेत उडणारे कंदील आकाशात सोडण्यात आले.

दीपोत्सवासाठी दुर्गप्रेमींची गर्दी

दरवर्षीप्रमाणे वसई विरारमधील ग्रामीण तसेच शहरी भागातून पणती आणि दिव्यांसह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. पण, गेल्या काही या प्राप्त झालेल्या प्रसिद्धीनंतर या दीपोत्सवात मुंबई, ठाणे, पालघरसारख्या विविध भागातून सहभागी झालेल्या दुर्गप्रेमींची संख्याही लक्षणीय होती.