वसई: राज्यातील महत्त्वाच्या ऐतिहासिक पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या जंजिरे वसई किल्ल्यात बुधवारी वसई विरार महापालिकेकडून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच पर्यटकांना स्वच्छ, सुरक्षित व आनंददायी वातावरण उपलब्ध करून देणे, हा या मोहिमेचा मूळ उद्देश असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

वसई पश्चिमेच्या किनारपट्टीवर वसलेल्या व मराठा इतिहास, पोर्तुगीज स्थापत्यकला आणि सांस्कृतिक वारसाचे प्रतीक असलेल्या जंजिरे वसई किल्ल्याला स्थानिकांसह राज्यातील तसेच देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. त्यामुळे वसईच्या समृद्ध इतिहासाचे प्रतीक असणारी किल्ल्यातील प्राचीन वास्तू, तटबंदी, मंदिरे, चर्च आणि अन्य ऐतिहासिक अवशेष यांच्या संवर्धनासाठी बुधवार, २९ जुलै रोजी महापौर अजीव पाटील व आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा विभागाकडून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

महापालिकेच्या स्वच्छता दूतांमार्फत नियोजनबद्ध पद्धतीने जंजिरे वसई किल्ला आणि आसपासच्या परिसरातील साफसफाईची कामे करण्यात येत आहेत. या मोहिमेअंतर्गत किल्ल्याच्या तटबंदीवर, बुरुजांवर तसेच मोकळ्या जागांमध्ये उगवलेले गवत, झुडपे व काटेरी वनस्पती काढणे, प्लास्टिक व इतर साचलेला कचरा उचलणे, पालापाचोळा व इतर घनकचऱ्याची विल्हेवाट लावणे, पायवाटा व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करणे आदी कामे करण्यात येत आहेत.

किल्ल्याच्या व किल्ला परिसरातील पुरातत्वीय रचनेला, बांधकामाला कोणताही धक्का न लावता स्वच्छतेची कामे केली जात असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. पर्यटनाला चालना मिळावी आणि शहराची स्वच्छ, सकारात्मक प्रतिमा निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे किल्ला परिसरात प्लास्टिक किंवा कचरा टाकू नये आणि या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.