वसई: ऐतिहासिक वारसा असलेल्या वसई किल्ल्यातील पुरातन वास्तू सद्यस्थितीत प्रशासकीय दुर्लक्षामुळे धोक्यात आल्याचे चित्र आहे. पोर्तुगीज काळात १५३०-४० च्या दशकात फ्रान्सिस्कन संप्रदायाच्या अंतर्गत किल्ल्याच्या आत बांधण्यात आलेल्या पहिल्या काही महत्त्वाच्या चर्चेसपैकी एक असलेल्या ‘फ्रान्सिस्कन’ चर्चच्या( संत अंतोनी चर्च)

छताच्या अंतर्गत भागातील शिळा आता कोसळू लागल्या आहेत. यामुळे येथे येणाऱ्या हजारो पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.वसईच्या पश्चिमेला खाडीकिनारी वसलेला हा ऐतिहासिक किल्ला तब्बल ११० एकर परिसरात पसरलेला आहे. हा किल्ला केवळ वसई तालुक्याचाच नव्हे, तर संपूर्ण पालघर जिल्ह्याचा एक अभिमानास्पद ऐतिहासिक वारसा आहे.

​पोर्तुगीज आणि मराठा संस्कृतीचा संगम: पोर्तुगीज राजवटीत बांधण्यात आलेल्या वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेली चर्च आणि ऐतिहासिक इमारती, वास्तू या किल्ल्यात आहेत. मात्र सद्यस्थितीत येथील अनेक ऐतिहासिक वास्तूंची दयनीय अवस्था होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या किल्ल्यात ‘फ्रान्सिस्कन’ चर्च ही आहे. मात्र, गेल्या काही काळापासून या वास्तूकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे चर्चच्या छताच्या आतील बाजूस लावण्यात आलेल्या अजस्त्र शिळा निखळून खाली पडत आहेत. कोसळलेल्या एका शिलेच्या दगडाचे वजन तब्बल ४५० ते ५०० किलो इतके प्रचंड आहे. जर एखादा पर्यटक खाली उभा असताना ही शिळ कोसळली तर मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ​अजूनही काही शिळा धोकादायक अवस्थेत लटकलेल्या

धक्कादायक बाब म्हणजे, छताच्या भागातून काही शिळा आधीच खाली कोसळल्या असताना, अजूनही अनेक महाकाय शिळा अत्यंत धोकादायक अवस्थेत वर लटकत आहेत. पावसाळा तोंडावर आलेला असताना किंवा वाऱ्या-पावसामुळे या शिळा कधीही खाली कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

‘फ्रान्सिस्कन’ चर्च हे पुरातन कालीन चर्च आहे. मागील महिन्यातच तीन ते चार शिळा कोसळल्या आहेत. त्यामुळे या भागात पुरातत्व विभागाकडून सूचना फलक लावणे आवश्यक आहे असे इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी सांगितले आहे. याशिवाय ज्या शिळा लटकत आहेत त्या सुरक्षित पणे काढून त्याठिकाणी योग्य ती दुरुस्ती करावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे.

या चर्चच्या दुरुस्तीच्या संदर्भात आम्ही आमच्या वरिष्ठ स्तरावर कळविले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ज्या काही आवश्यक उपाययोजना असतील त्याकडे ही प्रामुख्याने लक्ष दिले जाईल.- कैलास शिंदे, अधीक्षक पुरातत्व विभाग वसई.