वसई : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणाऱ्या भक्तांनी आता गणपतीच्या सजावटीतही निसर्गाचा सुरेख मेळ घातला आहे. गणेशमूर्तीचे रूप अधिक खुलून दिसावे यासाठी यंदा विविधरंगी नैसर्गिक फुलांच्या कंठ्यांना मोठी पसंती मिळत असल्याचे चित्र वसईसह सर्वच प्रमुख बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यापासूनच बाजारात आकर्षक आणि सुबक फुलांच्या कंठ्यांची जोरदार खरेदी-विक्री सुरू असून, या व्यवसायातून फुलसजावट कलाकारांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
मागील काही वर्षांत मोत्यांच्या आणि कृत्रिम कंठ्यांचा ट्रेंड लोकप्रिय होता, मात्र अलीकडच्या काळात नैसर्गिक फुलांपासून तयार केलेल्या कंठ्यांनी बाजी मारली आहे. फुलसजावट कलाकार (फ्लॉवर आर्टिस्ट) शेवंती, गुलाब, ऑर्किड, अष्टर, मोगरा, झिपरी, तगर आणि जिप्सी यांसारख्या विविध नैसर्गिक फुलांची अत्यंत नाजूकपणे आणि सुरेख गुंफण करून या कलात्मक कंठ्या साकारत आहेत. एका डिझायनर कंठीची रचना पूर्ण करण्यासाठी सुमारे दोन ते अडीच तासांचा कालावधी लागत असल्याचे कलाकार सांगतात. गणेशमूर्तीच्या गळ्यात या रंगीबेरंगी फुलांच्या कंठ्या घातल्यामुळे मूर्तीचे सौंदर्य आणि सात्विकता अधिकच वाढते; यामुळेच भाविक या कंठ्यांची खरेदी अत्यंत उत्साहाने करत आहेत.
सणासुदीच्या काळात बाजारात फुलांची आवक कमी-अधिक झाल्याने आणि फुलांचे भाव वाढल्यामुळे यंदा कंठ्यांच्या किमतीतही साधारण शंभर ते दोनशे रुपयांची वाढ झाली आहे. सध्या बाजारात एक ते दीड फुटांची कंठी ४०० रुपयांपासून ते २५०० रुपयांपर्यंत विकली जात आहे. कंठीची किंमत मुख्यतः त्यावरील कलाकुसर, डिझाइन आणि त्यात वापरण्यात आलेल्या फुलांच्या दुर्मिळतेवर ठरवली जात असल्याचे विक्रेत्यांनी स्पष्ट केले आहे.
तर दुसरीकडे मुकुट, कंठी आणि श्री गणेशाच्या हातातील बाजूबंद असा संपूर्ण संच (सेट) तयार करून १५०० ते २५०० रुपयांना त्याची विक्री होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी केवळ वसईतूनच नव्हे तर अन्य भागांतूनही मोठी मागणी येत असल्याचे कलाकार सायली तरे यांनी सांगितले.
याआधी केवळ छंद म्हणून फुलांपासून कंठी व इतर साहित्य बनवत होते. मात्र याबाबत प्रशिक्षण घेतल्यानंतर फुलांच्या कंठ्या व इतर साहित्याला मोठी मागणी येत असल्याने माझ्या छंदाचे व्यवसायात रुपांतर झाले आहे. असे कलाकार कशिश पाटील यांनी सांगितले.
“यापूर्वी शेवंती किंवा झेंडू यासारख्या फुलांपासून तयार केलेले हारच कंठी स्वरूपात वापरले जात होते. परंतु आता विविध प्रजातींच्या फुलांची सुरेख गुंफण करून कंठी व इतर साहित्य तयार केले जाते. यामुळे फुलांचे नवनवीन प्रकार हाताळण्याचे आणि कला सादर करण्याचे बळ मिळत आहे.” अशी प्रतिक्रिया राईगाव भाईंदर येथील कलाकार स्नेहल म्हात्रे यांनी लोकसत्ताला दिली.
फुलसजावट प्रशिक्षणाकडे वाढता कल
फुलसजावट कला शिकण्याकडे तरुण कलाकारांचा, विशेषतः मुलींचा कल झपाट्याने वाढताना दिसत आहे. केवळ गणेशोत्सवच नव्हे, तर लग्नसराई, डोहाळेजेवण आणि इतर विविध सणांमध्ये फुलांपासून तयार केलेल्या दागिन्यांची फॅशन प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या नवीन ट्रेंडमुळे तरुण कलाकारांना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध झाल्या आहेत.
गणेशोत्सवातील या फुलांच्या कंठ्यांमुळे आणि गौरी गणपतीसाठी लागणाऱ्या आकर्षक वेण्यांमुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला असून, हा उपक्रम पर्यावरणपूरक सजावटीला प्रोत्साहन देणारा ठरत आहे.
