वसई:-सामूहिक बलात्कार प्रकरणातील वर्षभरापासून फरार असलेल्या आरोपीला नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. नागेश गायकवाड असे या आरोपीचे नाव असून त्याला पुण्यातील कामशेत येथून ताब्यात घेतले. या प्रकरणातील हा चौथा पाहिजे आरोपी होता.नोव्हेंबर २०२४ मध्ये पीडित महिला नोकरीच्या शोधात पुण्यात आली होती. मुलाखतीला उशीर झाल्याने तिला मुलाखत देता आली नव्हती.त्यामुळे ती हताश झाली होती.
तिच्या पतीचा मित्र आरोपी पवन राजेंद्र प्रसाद सब्बत याने तिला नोकरीचे आमिष दाखवून मीरा रोड येथे आणले होते. त्यानंतर त्याने वसईच्या नायगाव येथील चंडिका मंदिराजवळील एका खोलीत तिला डांबून ठेवून तिच्यावर पवन सब्बत, धनराज चव्हाण आणि अभिषेक पुजारी तीन जणांनी सामूहिक अत्याचार केले. तर नागेश गायकवाड याने ही पुणे येथे छेडछाड करून तिच्याकडील ७५ हजारांचा मुद्देमाल लुटला होता.
या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारी वरून नायगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमान्वये चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी पवन सब्बत, धनराज चव्हाण आणि अभिषेक पुजारी या तिघांना अटक करण्यात आली होती, मात्र नागेश गायकवाड फरार होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे नागेशचा शोध घेतला. तो पुण्यातील कामशेत येथे असल्याची खात्री पटताच पथकाने सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय कदम, सहायक पोलीस निरीक्षक गणेश केकान, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे,पोलीस हवालदार सचिन ओलेकर,सचिन मोहिते, पोलीस अंमलदार चेतन ठाकरे, सचिन खंताळ, अमर पवार व त्यांच्या पथकाने केली आहे.
