वसई:- वसई पूर्वेच्या गावराईपाडा परिसरात एका तलावात बुडून चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. विवेक शुक्ला असे मयत मुलाचे नाव आहे.
वसई पूर्वेच्या भागात गावराईपाडा परिसर आहे. या परीसरात हनुमान मंदिराजवळ जीवन नगर भागात विवेक शुक्ला हा आपल्या आई वडिलांच्या सोबत राहत होता. सोमवारी सकाळच्या सुमारास विवेक हा घरा शेजारी खेळत होता. खेळता खेळता तो तुळशीमामा तलावाजवळ गेला याच वेळी त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. या घटनेची माहिती आजूबाजूच्या नागरिकांना मिळताच घटनास्थळी धाव घेत त्याला तलावातून बाहेर काढले व तातडीने वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
मात्र नाका तोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तलावाला संरक्षक जाळ्या नाहीत त्यामुळे अशी दुर्घटना घडली असल्याची प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली आहे. तलावाच्या सुरक्षेकडे लक्ष देण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
या पूर्वीची घटना
२६ नोव्हेंबर २०२५ – विरार पूर्वेच्या फुलपाडा परिसरात महापालिकेच्या तलावात बुडून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तलावाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीवर खेळत असताना अचानक जाळी तुटल्याने पाण्यात पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

