वसई: वसई पश्चिमेतील जी. जी. महाविद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी सकाळी ७ फूट लांबीचा अवाढव्य अजगर आढळून आला. मात्र, हा अजगर बिनविषारी असल्याचे आणि सर्पमित्राने वेळीच त्याला सुरक्षितरीत्या पकडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. वसई-विरार शहरातील हिरवीगार वनराई, झाडी-झुडपे आणि पाणथळ जागांमुळे या भागात विविध वन्यजीवांसह सापांचा मोठा अधिवास आहे. परंतु, सध्या वाढती उष्णता, आटत चाललेले पाण्याचे नैसर्गिक स्रोत आणि अन्नाचा शोध यांमुळे हे प्राणी मानवी वस्त्यांमध्ये आणि गर्दीच्या ठिकाणी प्रवेश करू लागले आहेत. शुक्रवारी सकाळी असाच एक अजस्त्र सर्प महाविद्यालयाच्या आवारात शिरला.

सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास प्रांगणातून जात असताना हा अजगर मला दिसला. त्यानंतर काही वेळातच महाविद्यालयाच्या कॅन्टीनच्या भिंतीशेजारी तो वेटोळा घालून बसल्याचे स्पष्ट झाले. कॅन्टीनजवळ अजगर दिसल्याची माहिती कर्मचाऱ्याने देताच, आम्ही तात्काळ सर्पमित्र हेमंत पवार यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना बोलावून घेतले, अशी माहिती प्राध्यापिका ट्रीझा परेरा यांनी दिली.

फोन आल्यानंतर अवघ्या अर्ध्या-पाऊण तासात सर्पमित्र हेमंत पवार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कोणताही धोका न पत्करता अत्यंत कौशल्याने आणि अलगदपणे त्या अजगराला पकडले. “हा ‘इंडियन पायथन’ (अजगर) प्रजातीचा साप असून त्याची लांबी तब्बल ७ फूट होती. ही प्रजाती पूर्णपणे बिनविषारी असते. सुरक्षिततेची खात्री केल्यानंतर आम्ही या अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त केले,” अशी माहिती सर्पमित्र हेमंत पवार यांनी दिली.

नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

वाढत्या उकाड्यामुळे आणि पाण्याच्या शोधात साप बहुधा सावलीच्या, थंड आणि सुरक्षित जागा शोधतात. त्यामुळे घरे, बंद खोल्या, उभी केलेली वाहने, तसेच पालापाचोळा किंवा वाढलेली झाडे-झुडपे अशा ठिकाणी सापांचा वावर वाढतो. परिसर स्वच्छ ठेवणे आणि अशा ठिकाणी वावरताना आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.