वसई: वसई पूर्वेकडील अत्यंत वर्दळीचा भाग मानल्या जाणाऱ्या गोखीवरे ते रेंज नाका परिसरातील मुख्य रस्ता पाण्याखाली गेला असून, शनिवारी पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथे भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. रस्ते जलमय झाल्याने आणि ठिकठिकाणी पाणी साचल्याने महामार्गाला जोडणाऱ्या या भागात हजारो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे दैनंदिन प्रवास करणारे नागरिक आणि औद्योगिक क्षेत्रातील कामगार कमालीचे त्रस्त झाले आहेत.

​वसई-विरार शहर आणि मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे मुख्य रस्ते याच भागातून जातात. शहराच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असल्याने येथून वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. गेल्या काही वर्षांत वसईसह रेंज नाका, वालीव, सातीवली आणि भोयदापाडा या भागांत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून औद्योगिक क्षेत्राचाही विस्तार झाला आहे. परिणामी, या रस्त्यांवरील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे.

​मागील काही दिवसांपासून गोखीवरे ते रेंज नाका परिसरात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. त्यातच शनिवारी पहाटेपासून पावसाचा जोर प्रचंड वाढल्याने ही कोंडी अधिकच तीव्र झाली. महामार्गावरून शहरात येणाऱ्या आणि शहरातून महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे काही वाहने भर रस्त्यात बंद पडत आहेत, त्यामुळे नागरिकांना स्वतःची वाहने ढकलत नेण्याची वेळ आली आहे.या भागात अनेक लहान-मोठे कारखाने आणि कंपन्या असल्याने सकाळच्या सत्रात कामावर जाणाऱ्या हजारो कामगारांना या कोंडीचा मोठा फटका बसला. अनेक तास वाहने एकाच जागेवर अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत.