वसई: मागील पाच दिवसांपासून वसई-विरार शहरात मुसळधार पावसाचा जोर कायम असून ठिकठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या या पावसामुळे शहरात विविध दुर्घटना समोर येत असतानाच, वसईमध्ये एका सोसायटीची कंपाऊंड वॉल (संरक्षक भिंत) अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत भिंतीजवळ पार्क केलेल्या सुमारे १२ ते १५ दुचाकी वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे संबंधित सोसायटीची भिंत अचानक कोसळली. भिंत कोसळताच तिथे उभ्या असलेल्या सर्व बाईक ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या. सुदैवाने, दुर्घटना घडली त्या वेळी परिसरात किंवा भिंतीजवळ कोणीही नागरिक उपस्थित नव्हते, ज्यामुळे एक मोठी आणि गंभीर जीवितहानी टळली आहे. मात्र, ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्या १२ ते १५ दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

​या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे. नागरिकांनी तात्काळ प्रशासनाकडे धाव घेत परिसरातील इतर धोकादायक भिंतींची आणि बांधकामांची तपासणी करण्याची मागणी केली आहे. पुढील अनर्थ टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, सूरक्षेच्या दृष्टीने पावले उचलावीत, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे.