वसई: राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल शनिवारी दुपारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. वसई तालुक्याचा निकाल ८६.६५ टक्के इतका लागला असून २८ हजार ३५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या निकालात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे.  मात्र मागील वर्षीच्या तुलनेत निकालाच्या टक्केवारीत कमालीची घट झाली असून ७.१८ टक्क्यांनी निकालाचा टक्का घसरला आहे.

फेब्रुवारी – मार्च २०२६ रोजी राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला वसईतून ३२ हजार ८४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३२ हजार ७२० विद्यार्थी परीक्षेला बसले होते.१८ हजार ४९८ मुले तर १४ हजार २२२ मुलींचा समावेश होता. या परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी १ वाजता राज्य शिक्षण मंडळाने या परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर केला.

यात २८ हजार ३५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.यात १५ हजार ५७९ मुले (८४.२१टक्के) तर १२ हजार ७७३ मुली (८९.८१ टक्के) तर एकूण तालुक्याचा निकाल ८६.६५ टक्के इतका लागला असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.मागील वर्षी प्रमाणे यंदाही मुलींनी बारावीच्या परीक्षेत बाजी मारली आहे. मागील वर्षी तालुक्याचा निकाल हा ९३.८३ टक्के इतका लागला होता.

यावर्षी या निकालात घसरण झाली असून ८६.६५ टक्के इतका निकाल लागला आहे. यंदाच्या निकालात ७.१८ टक्क्यांची घसरण झाली आहे. निकाला पूर्वी विद्यार्थी व पालक यांच्यात धाकधूक होती. मात्र निकाल अतिशय चांगल्या प्रकारे लागल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.