वसई:,वसई तालुक्यातील भिनार परीसरातील शासकीय गायरान जागेत अनधिकृतपणे माती उत्खनन व त्याची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. महसूल विभागाने त्यावर कारवाई करीत मांडवी पोलीस ठाण्यात दोन जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात सुमारे ३० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मौजे भिनार येथील स.नं. ४३ हि. २६ या १८.६५ हेक्टर क्षेत्राच्या शासकीय  गुरुचरण जागा आहे. याच जागेतून १० मार्च २०२६ रोजी पहाटे महसूलविभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेताच या जागेत सुमारे ३ हजार २१० ब्रास मातीचे बेकायदेशीर उत्खनन करून त्याची चोरी केली आहे. या चोरी केलेल्या मातीचे शासकीय बाजारमूल्य हे ६१ लाख ४० हजार इतके आहे.

​भाताणे येथील ग्राम महसूल अधिकारी अनिकेत नितीन काळेल (२८) यांच्या तक्रारीवरून मांडवी पोलीस ठाण्यात दोन जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय या कारवाईत दोन जेसीबी, दोन ट्रक व माती असा एकूण सुमारे ३० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन व वाहतूक यावर कारवाई करण्यासाठी पथके नियुक्त केली असून त्यांच्यामार्फत ही कारवाई सुरू केली असल्याची माहीती वसईचे तहसीलदार दीपक गायकवाड यांनी सांगितले आहे.

बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीवर कारवाई

वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागात कोणत्याही प्रकारची परवानगी ( रॉयल्टी) न घेताच रेती, माती, दगड याची वाहतूक केली जाऊ लागली आहे. नुकताच महसूल विभागाने विरार पूर्वेच्या खार्डी येथे विना परवाना दगड वाहतूक करणाऱ्या ४ ट्रक जप्त केले असून त्यात सुमारे १६ ब्रास इतका मुद्देमाल आढळून आला आहे अशी माहिती महसूल विभागाने दिली आहे.