वसई: ३२ कोटी रुपयांचे देणे चुकवण्यासाठी स्वतःच्याच भागीदाराची हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघड झाली आहे. ‘जी.एस.एम. फॉईल्स लिमिटेड’चे भागीदार मोहनसिंग परमार यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा वालीव पोलिसांनी पर्दाफाश केला असून, मुख्य सूत्रधार सागर गिरीश भानुशाली याच्यासह एकूण सात आरोपींना अटक केली आहे.

२४ जुलै रोजी संध्याकाळी वसई पूर्वेतील वालीव नाईकपाडा इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात उद्योजक मोहन सिंग परमार यांच्यावर दोन अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. यात परमार हे गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपासासाठी ११ पथके नियुक्त केली होती. तपासादरम्यान आरोपी उत्तर प्रदेशात लपून बसल्याची खात्री पटताच वालीव पोलिसांचे विशेष पथक उत्तर प्रदेश येथे रवाना झाले आणि आरोपीना अटक केली आहे. सध्या या प्रकरणात ७ आरोपींना अटक करण्यात आली. यात मुख्य सूत्रधार सागर भानुशाली याच्यासह विजयकुमार विश्वकर्मा, सुजित पांडे, मनोज ठठेरा, गोकुल गौतम, अनुप प्रजापती अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत.

कोट्यवधीच्या कर्जामुळे हत्येचा कट

जखमी मोहनसिंग परमार व मुख्य आरोपी सागर गिरीश भानशाली हे दोघे कंपनीत भागीदार आहेत. आरोपी सागर भानशाली याने अमेरिकन शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केली होती; मात्र तेथील घसरणीमुळे त्याला कोट्यवधी रुपयांचा फटका बसून तो मोठ्या कर्जात बुडाला होता. या आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्याने भागीदार मोहनसिंग परमार यांना कंपनीतील शेअर्स विकण्यास प्रवृत्त केले आणि त्याद्वारे परमार यांच्याकडून सुमारे ३२ कोटी रुपये मिळवले. मात्र, परमार यांची हत्या केल्यास ३२ कोटी रुपयांची ही रक्कम परत करावी लागणार नाही आणि कंपनीवरही संपूर्ण वर्चस्व मिळवून मोठा आर्थिक फायदा होईल, या हेतूने भानुशाली याने परमार यांच्या हत्येचा कट रचल्याचे तपासातून उघड झाले असल्याचे अपर पोलीस आयुक्त संजय शिंत्रे यांनी सांगितले आहे.