सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक विक्रीच्या तक्रारी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुहास बिऱ्हाडे

वसई : वसई-विरार शहर अमली पदार्थाचे केंद्र बनत चालले असून शहरात मोठय़ा प्रमाणावर अमली पदार्थाची विक्री आणि सेवन होत आहे. यामुळे गुन्हेगारीचे प्रमाणही वाढू लागले आहे. वसईतील सहा पोलीस ठाणी अमली पदार्थाचे ‘हॉटस्पॉट’ बनले असून या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अमली पदार्थाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी या सहा पोलीस ठाण्यांना दररोज कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वसई-विरार शहर अमली पदार्थाच्या विळख्यात सापडू लागले आहे. शहरात अमली पदार्थाचे तस्कर, वितरक सक्रिय असून दररोज मोठय़ा प्रमाणात अमली पदार्थाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू आहेत. त्यांची पाळेमुळे शहरात खोलवर रुजत आहेत. अगदी शाळकरी आणि महाविद्यालयीन तरुण-तरुणीही या अमली पदार्थाच्या व्यसनात गुरफटू लागले आहेत. त्याचे भीषण परिणाम दिसू लागले आहेत. एमडी, चरस, गांजा, कोकेन, मॅथ्रेडॉन अशा प्रकारच्या विविध अमली पदार्थाची विक्री आणि सेवन वसई-विरार शहरात होत आहे. शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढत असून बहुतांश गुन्हेगार हे अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे आढळून आले आहे. अमली पदार्थाच्या सेवनासाठी अनेक जण गुन्हेगारी कृत्य करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अमली पदार्थाचे दुष्टचक्र भेदण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अमली पदार्थाचे सर्वाधिक प्रमाण आहे. त्यात नालासोपारा, तुळिंज, पेल्हार, वालीव, विरार आणि आचोळे या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. त्यामुळे अमली पदार्थाची विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर दररोज कारवाई करण्याचे आदेश या सहा पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. त्यासाठी या सहा पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांचा व्हॉट्सअ‍ॅप समूह तयार करण्यात आला आहे. दररोज किती कारवाई केली त्याची माहिती या समूहावर टाकावी लागणार आहे. या दैनंदिन कारवाईचा अहवाल पोलीस आयुक्त सदानंद दाते हे दररोज घेणार आहेत.

आम्ही वर्षभर सातत्याने अमली पदार्थविरोधात कारवाई करत आहोत. मात्र अमली पदार्थाची मुळे खोलवर रुजली असल्याने आता व्यापक प्रमाणात दररोज कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे)

वर्षभरात १४१ गुन्हे, पावणेसहा कोटींचा मुद्देमाल जप्त

आयुक्तालयाच्या स्थापनेपासून मागील १३ महिन्यांत अमली पदार्थाशी संबंधित एकूण १४१ गुन्हे दाखल करण्यात आले. या संपूर्ण कारवाईत एकूण ५ कोटी ७३ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात विक्री करणाऱ्या १९३ जणांना (पेडलर्स) अटक करण्यात आली. याशिवाय अमली पदार्थ बाळगणारे आणि सेवन करणाऱ्यांविरोधात एकूण ५२० कारवाया करून ६१२ जणांना अटक करण्यात आली, अशी माहिती अमली पदार्थविरोधी पथकाचे (एएनसी) प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास हांडोरे यांनी दिली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai intoxicated police students ysh
First published on: 03-12-2021 at 01:09 IST